“कामही दिसू द्या, केवळ घोषणा नकोत”; अपेक्षांच्या उंबरठ्यावर महाबळेश्वर पंचायत समिती
“कामही दिसू द्या, केवळ घोषणा नकोत”; अपेक्षांच्या उंबरठ्यावर महाबळेश्वर पंचायत समिती ✍️जितेंद्र कारंडे , प्रतापगड प्रतिनिधी : महाबळेश्वर तालुक्यात सत्तांतरानंतर नवे नेतृत्व सत्तेवर आले आणि त्याच वेळी जनतेच्या अपेक्षांचाही स्तर उंचावला. काही ठिकाणी सुरुवातीचे हालचाली, बैठका आणि नियोजनाची गती दिसत असली, तरी आता खऱ्या अर्थाने जमिनीवर काम दिसण्याची वेळ आली आहे. “घोषणा चांगल्या आहेत, पण त्याची फळे गावात दिसली पाहिजेत,” अशी थेट आणि स्पष्ट प्रतिक्रिया नागरिक देताना दिसत आहेत. तालुक्याची रचना पाहता आव्हाने नक्कीच मोठी आहेत. ७९ ग्रामपंचायती, डोंगर-दऱ्यांमध्ये पसरलेल्या वाड्या-वस्त्या, दुर्गम भागातील संपर्काचा अभाव — या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर काम सोपे नाही, हे मान्य करावेच लागेल. विशेषतः कोयना खोरे आणि कांदटी खोरे भागातील परिस्थिती आजही आव्हानात्मक आहे. मात्र, या कठीण परिस्थितीतच नेतृत्वाची खरी ओळख घडते, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २२ गावे दत्तक घेण्याची घोषणा केल्याने तालुक्याला एक मोठी संधी मिळाली आहे. ही घोषणा केवळ...