साताऱ्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज कोसळून २४ शेळ्या ठार, मेंढपाळ गंभीर जखमी

साताऱ्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज कोसळून २४ शेळ्या ठार, मेंढपाळ गंभीर जखमी

सातारा प्रतिनिधी : 

सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत धुमाकूळ घातला असून, वीज कोसळण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण २४ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. खंडाळा तालुक्यात ८ शेळ्या ठार झाल्या, तर वाई तालुक्यातील आसले येथे १६ शेळ्यांचा मृत्यू झाला असून एक मेंढपाळ गंभीर जखमी झाला आहे. या घटनांमुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


खंडाळा तालुक्यातील मोर्वे गावातील सोलाडी शिवारात शेतकरी अमोल गोपाळ धायगुडे यांच्या मालकीच्या आठ शेळ्यांचा वीज पडून मृत्यू झाला, तर एक मेंढी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दुसरी घटना वाई तालुक्यातील आसले गावात घडली. सोमवारी दुपारी गडगडाटासह गारांसह मुसळधार पावसाची सुरुवात झाली असताना, सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास गावाजवळील पाण्याच्या टाकीजवळ मेंढपाळ नंदकुमार पांडुरंग पिसाळ (वय ५०) हे शेळ्या चारत असताना अचानक वीज कोसळली. या भीषण घटनेत १६ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेत नंदकुमार पिसाळ हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वाई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व त्यांच्या पथकाने मुसळधार पावसात घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये शिवाजी तोरडमल, चंद्रकांत भोसले, चालक कांबळे व होमगार्ड सुशांत धुरगुडे यांचा समावेश होता. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सिसोदे व तलाठी अभंग यांना बोलावून मृत शेळ्यांचा पंचनामा करण्यात आला. पंचनाम्याचा अहवाल तहसीलदार सोनाली मेटकरी आणि डीवायएसपी साळुंखे यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आला आहे.

तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी मृत प्रत्येक शेळीसाठी ४ हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, या घटनांमुळे आसले गावासह संपूर्ण वाई तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील खंडाळा, वाई, भुईंज आणि जावळी तालुक्यांत मुसळधार अवकाळी पावसामुळे शेतीचेही नुकसान झाल्याचे चित्र आहे. सध्या ज्वारी आणि गव्हाची कापणी सुरू असल्याने या पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान खात्याने पुढील दोन ते तीन दिवस अशाच प्रकारच्या पावसाचा अंदाज वर्तवला असून, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकरी व पशुपालकांना तातडीने मदत देऊन पंचनामे करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl