आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य


आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

प्रतापगड प्रतिनिधी : 

पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील बावली टोक–चिरेखिंड परिसरात गुरुवारी (दि. १२) पहाटे भीषण अपघात घडला. मुंबईहून आपल्या गावी परत येत असताना वॅग्नर कार सुमारे ३०० ते ४०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना सकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स, स्थानिक ग्रामस्थ आणि पोलादपूर पोलिसांच्या मदतीने अत्यंत धाडसी पद्धतीने बचावकार्य राबवण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील लाखवड गावचे काही ग्रामस्थ मुंबईहून आपल्या गावी येत होते. पहाटेच्या सुमारास आंबेनळी घाटातील बावली टोक–चिरेखिंड दरम्यान वाहनाचा ताबा सुटल्याने वॅग्नर कार रस्त्याच्या कडेला जाऊन खोल दरीत कोसळली. घाटातील हा भाग अत्यंत धोकादायक असल्याने अपघातानंतर वाहन थेट सुमारे ३०० ते ४०० फूट खोल दरीत जाऊन अडकले. पहाटेच्या शांत वातावरणात झालेल्या या अपघातामुळे स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेची माहिती प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य संकेत सावंत आणि ऋषिकेश जाधव यांना मिळताच त्यांनी तातडीने टीमच्या ग्रुपवर संदेश देत सर्व सदस्यांना सतर्क केले. माहिती मिळताच प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे अजित जाधव, अनिकेत वागदरे, संकेत सावंत आणि ऋषिकेश जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सदस्यांनाही या अपघाताची माहिती देण्यात आली.

रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचल्यानंतर प्रथम सर्व आवश्यक सुरक्षात्मक साधनांसह बचावकार्याची तयारी करण्यात आली. घाटातील खोल आणि अवघड दरीमुळे बचावकार्य करणे अत्यंत आव्हानात्मक होते. त्यानंतर दोरांच्या (रोप) सहाय्याने रेस्क्यू टीमचे सदस्य दरीत उतरले आणि जखमी प्रवाशांपर्यंत पोहोचले. सर्वात आधी गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीला स्ट्रेचरमध्ये सुरक्षित ठेवून रोपच्या मदतीने वर आणण्यात आले. त्यानंतर इतर जखमींनाही अत्यंत काळजीपूर्वक दरीतून बाहेर काढण्यात आले. या धाडसी आणि समन्वयपूर्ण बचाव मोहिमेमुळे सर्व जखमींना सुरक्षित वर आणण्यात रेस्क्यू टीमला यश आले.

या अपघातात अजय सुनील संकपाळ, तुकाराम संकपाळ, सुनील संकपाळ, पार्थ संकपाळ आणि संगीता संकपाळ हे प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी अत्यंत धोकादायक परिस्थितीत उतरून बचावकार्य करणाऱ्या स्वयंसेवकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या बचावकार्यात प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे अनिकेत वागदरे, अजित जाधव, ऋषिकेश जाधव, आशिष बिरामने आणि संकेत सावंत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनील बाबा भाटिया, अमित कोळी, सुजित कोळी आणि सोमनाथ वागदरे यांनीही सक्रिय सहभाग घेतला. याशिवाय वाडा कुंभरोशी आणि चिरेखिंड येथील ग्रामस्थांनी तातडीने मदतीचा हात देत बचावकार्यात सहकार्य केले. पोलादपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करत होते.

दरम्यान, आंबेनळी घाट हा राज्यातील अतिशय धोकादायक घाटांपैकी एक मानला जातो. सध्या या घाटात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी संरक्षक कठडे आणि सुरक्षित रेलिंग नसल्याने तसेच भरावाचे काम अपूर्ण राहिल्याने वाहनचालकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या भागात अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. प्रशासनाने तातडीने संरक्षक कठडे, मजबूत रेलिंग आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अन्यथा प्रवाशांच्या जीवाशी खेळ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या अपघाताबाबत अधिक तपास पोलादपूर पोलीस करत असून रेस्क्यू टीमच्या धाडसी कामगिरीमुळे मोठी जीवितहानी टळल्याची भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl