माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर, प्रतिनिधी : 

महाबळेश्वर–मेढा मुख्य रस्त्यावर माचूतर गावाच्या हद्दीत शनिवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. महाबळेश्वरहून साताऱ्याकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस आणि समोरून येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा दुर्दैवी अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून महाबळेश्वर शहरासह टेकवली गावावर शोककळा पसरली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वरपासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावरील माचूतर गावाच्या हद्दीत शनिवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. महाबळेश्वरहून साताऱ्याकडे निघालेली राजमाता जिजाऊ एसटी बस (क्र. एमएच १४ एनई ४२२५) आणि महाबळेश्वरच्या दिशेने येणारी दुचाकी (क्र. एमएच ११ एव्ही २०८८) यांची समोरासमोर भीषण धडक झाली.

या अपघातात नरेश रमेश भोंडेकर (वय ४५, रा. टेकवली, ता. महाबळेश्वर) यांचा जागीच मृत्यू झाला. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि एसटी बसच्या वाहकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी अवस्थेतील नरेश भोंडेकर यांना महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

मृत नरेश भोंडेकर हे महाबळेश्वर एसटी बसस्थानकाच्या मागील बाजूस, हॉटेल ड्रीमलँडसमोरील गाळ्यात मोबाईल रिपेअरिंगचे दुकान चालवत होते. नेहमीप्रमाणे ते आपल्या दुकानाकडे येत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, महात्मा गांधी रोड परिसरातील व्यापारी, गाळाधारक आणि मित्रपरिवाराने ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली.

शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नरेश भोंडेकर हे अत्यंत साध्या कुटुंबातील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, अवघी आठ महिन्यांची चिमुकली मुलगी आणि चार वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. कुटुंबातील कमावता व्यक्ती गमावल्याने भोंडेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून टेकवली गावासह संपूर्ण महाबळेश्वर शहरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, या अपघाताची नोंद महाबळेश्वर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक हर्षद गालिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक महारुद्र परजणे आणि पोलिस हवालदार संतोष शेलार पुढील तपास करत आहेत.

स्थानिक नागरिकांनी महाबळेश्वर–मेढा मार्गावरील धोकादायक वळणांवर अधिक प्रभावी सुरक्षा उपाययोजना, इशारा फलक आणि वाहनचालकांनी वेगमर्यादेचे काटेकोर पालन करण्याची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl