स्वदेस फाऊंडेशनकडून देवळे गावाची “स्वप्नातील गाव” म्हणून निवड; सर्वांगीण विकासासाठी नवी दिशा
स्वदेस फाऊंडेशनकडून देवळे गावाची “स्वप्नातील गाव” म्हणून निवड; सर्वांगीण विकासासाठी नवी दिशा
✍️प्रकाश कदम,
पोलादपूर प्रतिनिधी :
पोलादपूर तालुक्यातील देवळे गावाची “स्वप्नातील गाव” म्हणून स्वदेस फाऊंडेशनतर्फे निवड करण्यात आल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उपक्रमाअंतर्गत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबविण्यात येणार असून, ग्रामस्थांच्या सहभागातून आदर्श गाव उभारण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
स्वदेस फाऊंडेशनचे महाप्रबंधक तुषार इनामदार, वरिष्ठ व्यवस्थापक नजीर शिकलगार, विशाल वरुटे, व्यवस्थापक दीपेश जाधव आदी मान्यवरांनी देवळे गावाला भेट देऊन ग्रामविकास समितीला “स्वप्नातील गाव” निवडीचे अधिकृत पत्र सुपूर्द केले. तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन देण्यात आले.
कार्यक्रमावेळी स्वदेस फाऊंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक नजीर शिकलगार यांच्या हस्ते “स्वप्नातील गाव” या फलकाचे अनावरण करण्यात आले. ग्रामविकास समितीचे अध्यक्ष गणेश केसरकर, सचिव चंद्रकला केसरकर तसेच शंकर केसरकर, सुगंधा कदम, विठ्ठल केसरकर आणि रविंद्र केसरकर यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सुजल अहिरे, श्रुत्ती पवार, सनी पाटील यांच्यासह अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनोगत व्यक्त करताना ज्ञानदेव केसरकर आणि प्रकाश कदम यांनी गावामध्ये एलईडी पथदिव्यांची उभारणी तसेच पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत स्वदेस फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी गावाच्या गरजांनुसार विविध योजना राबविण्याची ग्वाही दिली.
नजीर शिकलगार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, स्वदेस फाऊंडेशनने अनेक गावांमध्ये जाऊन विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली असून, सरकारी योजना, स्थानिक नागरिक आणि संस्थेच्या संयुक्त सहकार्याने गावांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. देवळे गावानेही या संधीचा लाभ घेत आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी दीपेश जाधव यांनी शासन स्तरावर विविध विकासकामांसाठी पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणण्याचे आश्वासन दिले. तसेच स्वदेस फाऊंडेशनकडूनही आवश्यक ती मदत केली जाईल, मात्र ग्रामस्थांनी सातत्याने प्रयत्न करत “स्वप्नातील गाव” साकार करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद केसरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन जागडे सर यांनी मानले. या उपक्रमामुळे देवळे गावाच्या विकासाला नवी चालना मिळणार असून, भविष्यात हे गाव आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment