धुळदेवजवळ भीषण अपघात; रखडलेल्या रस्त्याचा बळी — दोन ठार, तीन गंभीर; आठ वर्षांच्या दुर्लक्षावर ग्रामस्थांचा संताप
धुळदेवजवळ भीषण अपघात; रखडलेल्या रस्त्याचा बळी — दोन ठार, तीन गंभीर; आठ वर्षांच्या दुर्लक्षावर ग्रामस्थांचा संताप
म्हसवड प्रतिनिधी –
माण तालुक्यातील म्हसवडजवळ धुळदेव गावाच्या हद्दीत आज सकाळी घडलेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून रखडलेल्या रस्ते कामामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा तालुक्यातील कोडोली येथील निकम कुटुंब देवदर्शनासाठी पंढरपूरकडे आल्टो कारने निघाले होते. सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास म्हसवडहून पुढे जात असताना धुळदेव गावाजवळील रस्त्याची अत्यंत खराब अवस्था असल्याने चालकाचा अंदाज चुकला. रस्त्यावर मोठे खड्डे आणि उखडलेला भाग अचानक समोर आल्याने चालकाने जोरात ब्रेक लावला. त्यामुळे कारने तीन ते चार पलट्या घेतल्या आणि हा भीषण अपघात घडला.
या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच धुळदेव ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवत जखमींना वाहनातून बाहेर काढले आणि तातडीने मदतकार्य सुरू केले.
दरम्यान, म्हसवड पोलिस ठाण्याचे कर्मचारी अभिजीत भादले, लुबाळ आणि हांगे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना १०८ रुग्णवाहिकेद्वारे म्हसवड येथील संचित रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर जखमींना पुढील उपचारासाठी सातारा येथील डॉ. क्रांतिसिंह रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या अपघातानंतर धुळदेव परिसरातील नागरिक संतप्त झाले असून त्यांनी या दुर्घटनेस थेट प्रशासनाला जबाबदार धरले आहे. सातारा–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील धुळदेव परिसरातील रस्त्याचे काम मागील आठ वर्षांपासून रखडलेले असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याची दुरवस्था, खड्डे आणि अपूर्ण काम यामुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, या धोकादायक ठिकाणी आतापर्यंत सुमारे २० जणांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक लहान-मोठे अपघात घडले आहेत. “आणखी किती निष्पाप जीवांचा बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल उपस्थित करत नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना आणि जिल्ह्यातील मंत्र्यांना प्रत्यक्ष घटनास्थळी येण्याचे आव्हान दिले आहे.
सध्या या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून रखडलेले रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या जीविताची हमी द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष घालून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
Comments
Post a Comment