हातरेवाडीत हरिनामाचा गजर; ज्ञानेश्वरी पारायण व हनुमान जन्मोत्सवाने परिसर भक्तिमय

हातरेवाडीत हरिनामाचा गजर; ज्ञानेश्वरी पारायण व हनुमान जन्मोत्सवाने परिसर भक्तिमय

✍️संतोष मालुसरे,

तापोळा प्रतिनिधी –

जावली तालुक्यातील मौजे हातरेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण व हनुमान जन्मोत्सवाचा भव्य आणि भक्तिमय सोहळा २९ मार्च ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. ग्रामस्थ मंडळ हातरेवाडी यांच्या पुढाकाराने आणि श्री पांडुरंगाच्या कृपेने साकारत असलेल्या या सप्ताहासाठी गावासह परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा हा सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

या सप्ताहाचे मार्गदर्शन ह.भ.प. बाळकृष्ण महाराज शिंदे (निपाणी) यांच्या नेतृत्वाखाली होत असून, ह.भ.प. आनंद महाराज कदम (आपटी), ह.भ.प. कृष्णा महाराज शिंदे (आळंदी), ह.भ.प. दीपक महाराज बनकर (आळंदी) यांच्यासह अनेक नामवंत प्रवचनकार, कीर्तनकार व भजनकार सहभागी होणार आहेत. त्यांच्या ओजस्वी वाणीतून होणारे प्रवचन आणि कीर्तन यामुळे भक्तांना आध्यात्मिक समाधान लाभणार आहे.

सप्ताहादरम्यान दररोज पहाटे काकड आरतीने दिवसाची सुरुवात होऊन सकाळी व दुपारी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सामुदायिक पारायण होणार आहे. सायंकाळी प्रवचन व हरिपाठ, तर रात्री कीर्तन आणि जागर यांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध गावांतील भाविक मंडळी जागरात सहभागी होणार असल्याने संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजरात दुमदुमून जाणार आहे.

सप्ताहातील प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या मान्यवर कीर्तनकार व प्रवचनकारांची उपस्थिती लाभणार असून, त्यांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची परंपरा आणि अध्यात्मिक विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. या कार्यक्रमामुळे युवकांमध्येही धार्मिक व सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

गुरुवार, २ एप्रिल रोजी सप्ताहाचा समारोप विविध धार्मिक कार्यक्रमांनी होणार आहे. सकाळी ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता, त्यानंतर श्री सत्यनारायणाची महापूजा, दिंडी सोहळा, काल्याचे कीर्तन आणि महाप्रसाद असे कार्यक्रम पार पडणार आहेत. ह.भ.प. बाळकृष्ण महाराज शिंदे यांचे काल्याचे कीर्तन हा या सोहळ्याचा मुख्य आकर्षणबिंदू ठरणार आहे.

या सोहळ्यासाठी विविध अन्नदात्यांनी पुढाकार घेत दररोज रात्रीच्या पंगतीचे आयोजन केले आहे. तसेच या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती अपेक्षित असून, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.

हातरेवाडी व परिसरातील ग्रामस्थ, सरपंच, पोलिस पाटील, देणगीदार आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक ग्रामस्थ मंडळ, सोमजाई काळेश्वरी माता महिला मंडळ, जय हनुमान क्रिकेट क्लब तसेच इतर संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl