१०५ गावांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘स्वराज्य फाउंडेशन’चा आदर्श उपक्रम; शिक्षण, आरोग्य, शेती व सामाजिक परिवर्तनाचा बहुआयामी ध्यास
१०५ गावांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘स्वराज्य फाउंडेशन’चा आदर्श उपक्रम; शिक्षण, आरोग्य, शेती व सामाजिक परिवर्तनाचा बहुआयामी ध्यास
प्रतापगड प्रतिनिधी :
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी मानल्या जाणाऱ्या कोयना नदीच्या निसर्गरम्य किनाऱ्यावर तसेच अतिदुर्गम डोंगररांगांमध्ये वसलेल्या जावली व महाबळेश्वर तालुक्यातील १०५ गावांच्या विकासाचा ध्यास घेत सन २०२१ मध्ये स्थापन झालेल्या ‘स्वराज्य फाउंडेशन’ या सेवाभावी संस्थेने अल्पावधीतच समाजकार्यात उल्लेखनीय कामगिरी बजावत ग्रामीण भागात आशेचा किरण निर्माण केला आहे. निस्वार्थ भावनेने प्रेरित सेवाप्रेमी तरुणांच्या एकत्रित विचारातून उभी राहिलेली ही संस्था केवळ मदतपुरती मर्यादित न राहता समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी व्यापक दृष्टीकोनातून कार्यरत आहे.
ग्रामीण भागातील आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक असमतोल दूर करून प्रत्येक कुटुंब सक्षम व स्वावलंबी व्हावे, हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. समाजातील गरीब, वंचित व दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे, शेतकऱ्यांना पाण्याच्या उपलब्धतेसाठी छोटे तलाव, शेततळी व बंधारे उभारून शेतीस पूरक वातावरण निर्माण करणे, तसेच पारंपरिक शेतीसोबत व्यावसायिक व सामुदायिक शेतीला प्रोत्साहन देणे यावर संस्थेचा विशेष भर आहे. याशिवाय, समाजप्रबोधनाच्या माध्यमातून अनाठायी खर्चाला आळा घालणे, लग्नसमारंभ व इतर पारंपरिक कार्यक्रम साधेपणाने पार पाडण्यास प्रवृत्त करणे, आणि सामाजिक जागृती वाढवणे यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.
पर्यावरण संवर्धनालाही संस्थेने आपल्या कार्याचा केंद्रबिंदू बनवले असून ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या ब्रीदवाक्याप्रमाणे वृक्षारोपण मोहिमा राबवून विशेषतः फळझाडांची लागवड करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळण्याबरोबरच निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होत आहे. तसेच, वणव्यामुळे होणारे पर्यावरणीय नुकसान लक्षात घेऊन जनजागृती मोहिमांद्वारे वणवा रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
संस्थेने विविध योजनांच्या माध्यमातून थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी मॉडेल उभे केले आहे. ‘स्वराज्य दिव्यांग/वयोवृद्ध आधार योजना’ अंतर्गत निराधार दिव्यांग व वयोवृद्ध व्यक्तींना दरमहा ७०० रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. सध्या ४२ लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असून, भविष्यात अधिकाधिक गरजू व्यक्तींना या योजनेत सामावून घेण्याचा संस्थेचा मानस आहे.
शिक्षण क्षेत्रात ‘स्वराज्य विद्यार्थी शैक्षणिक आधार योजना’ हा महत्त्वाचा उपक्रम ठरत आहे. आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात खंड पडू नये यासाठी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांची निवड करून त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी संस्था उचलते. १३ मे २०२४ रोजी सुरू झालेल्या या योजनेत सध्या ३५ विद्यार्थ्यांचा समावेश असून, आगामी काळात ही संख्या वाढवण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होत आहे.
तसेच, ‘स्वराज्य वैद्यकीय आधार योजना’ अंतर्गत कर्करोगासारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त तसेच अपघातग्रस्त गरजू नागरिकांना आर्थिक मदत दिली जाते. उपचारांच्या खर्चामुळे अडचणीत सापडलेल्या अनेक कुटुंबांना या योजनेमुळे दिलासा मिळाला आहे. समाजातील कोणताही घटक आर्थिक विवंचनेमुळे उपचारांपासून वंचित राहू नये, हा संस्थेचा प्रमुख हेतू असून त्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
याशिवाय, निराधार वृद्ध, दिव्यांग, अनाथ तसेच गरजू विद्यार्थ्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू उपलब्ध करून देणे, सांस्कृतिक व सामुदायिक उपक्रमांद्वारे समाजात एकात्मता निर्माण करणे, आणि स्थानिक पातळीवर नेतृत्व विकसित करणे अशा विविध अंगांनी संस्था कार्यरत आहे.
एकंदरीत, ‘स्वराज्य फाउंडेशन’ ही संस्था १०५ गावांच्या विकासासाठी केवळ योजना राबवणारी संस्था नसून सामाजिक परिवर्तनाची चळवळ बनत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन विकासाचा मार्ग प्रशस्त करण्याचा संस्थेचा प्रयत्न भविष्यात ग्रामीण भागासाठी आदर्श ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
Comments
Post a Comment