‘पुस्तकांचे गाव’ भिलारमध्ये आरोग्य सेवेचा बोजवारा; दुपारनंतर उपकेंद्र बंद, नागरिक त्रस्त
‘पुस्तकांचे गाव’ भिलारमध्ये आरोग्य सेवेचा बोजवारा; दुपारनंतर उपकेंद्र बंद, नागरिक त्रस्त
पाचगणी प्रतिनिधी:
राज्यात ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून विशेष ओळख निर्माण केलेल्या भिलार येथे आरोग्य सेवेची अत्यंत दयनीय अवस्था समोर येत असून पाचगणी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणारे भिलार उपकेंद्र दुपारनंतर बंद राहत असल्याने रुग्णांची मोठी परवड होत आहे. सकाळच्या वेळेत काही प्रमाणात सेवा सुरू असली तरी दुपारनंतर उपकेंद्राला कुलूप लागलेले दिसत असल्याने नागरिकांना उपचारासाठी भटकंती करावी लागत आहे.
भिलार गावासह कासबंड, उंबरी, दानवली, धामुणेवाडी, घोटघर, अखेगणी आणि भोसे या परिसरातील नागरिक या उपकेंद्रावर प्राथमिक आरोग्य सेवांसाठी अवलंबून आहेत. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण तपासणी, औषधोपचार आणि वैद्यकीय सल्ल्यासाठी येथे येत असतात. मात्र दुपारनंतर उपकेंद्र बंद असल्यामुळे अनेक रुग्णांना निराश होऊन परत जावे लागत आहे. काहींना तातडीच्या उपचारासाठी ५ ते ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या पाचगणी येथे जावे लागत असून त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा ताण सहन करावा लागत आहे.
या परिस्थितीचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना बसत आहे. विशेषतः ६५ ते ७० वर्षांवरील वृद्धांना नियमित तपासणीची गरज असताना त्यांना घरपोच सेवा देण्यास नकार दिला जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे अनेक रुग्ण आवश्यक वैद्यकीय सेवांपासून वंचित राहत असून त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांनी आरोग्य विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला आहे. सामाजिक कार्यकर्ते अशोक भिलारे यांनीही या संदर्भात संताप व्यक्त करत, “उपकेंद्रात अपेक्षित सुविधा मिळत नाहीत, उलट रुग्णांशी उद्धट वागणूक दिली जाते. माझ्या ७५ वर्षांच्या वडिलांची घरी तपासणी करण्यास नकार देण्यात आला. अशा परिस्थितीत आम्ही जायचे तरी कुठे?” असा सवाल उपस्थित केला आहे.
दरम्यान, भिलार हे राज्यातील एक महत्त्वाचे पर्यटन आकर्षण असताना येथेच मूलभूत आरोग्य सुविधा कोलमडल्याचे चित्र दिसत असल्याने प्रशासनाची प्रतिमा धुळीस मिळत असल्याची चर्चा सुरू आहे. नागरिकांनी आरोग्य विभागाने तातडीने लक्ष घालून भिलार उपकेंद्र दुपारनंतरही नियमित सुरू ठेवावे, पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी ठाम मागणी केली आहे. अन्यथा येत्या काळात आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला असून हा प्रश्न अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment