संघर्षातून यशाच्या शिखराकडे; महाबळेश्वरात कर्तृत्ववान महिलांचा ‘वूमन एक्सलेन्स अवॉर्ड’ने गौरव
संघर्षातून यशाच्या शिखराकडे; महाबळेश्वरात कर्तृत्ववान महिलांचा ‘वूमन एक्सलेन्स अवॉर्ड’ने गौरव
महाबळेश्वर प्रतिनिधी :
जीवनातील कठीण प्रसंगांना धैर्याने सामोरे जात, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर आपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या आणि इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा महाबळेश्वर येथे सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. भारत बियाँड बॉण्डरिज फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात ‘वूमन एक्सलेन्स अवॉर्ड’ प्रदान करून विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्याची दखल घेण्यात आली.
या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. भाग्यश्री मोहन शिंदे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या शिवानीताई कळसकर, डॉ. अनुराधा दिवेकर, नीलम टांगारी तसेच स्मिता रांजणे यांचा शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी गौरवप्राप्त महिलांच्या कार्याचे मनापासून कौतुक करत त्यांच्या संघर्षमय प्रवासाला सलाम केला.
समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यामागील उद्देश स्पष्ट करताना डॉ. भाग्यश्री शिंदे म्हणाल्या की, आजच्या काळात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांना, मेहनतीला आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाला योग्य सन्मान मिळणे अत्यंत आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे महिलांना केवळ प्रोत्साहनच मिळत नाही, तर नव्या पिढीसमोर आदर्शही निर्माण होतो.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन आत्मविश्वासाने आपली ओळख निर्माण करावी, समाजात सकारात्मक बदल घडवावा आणि इतरांसाठी प्रेरणास्त्रोत बनावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. उपस्थित महिलांनीही अशा सन्मानामुळे आपल्या कार्याला अधिक बळ मिळते, अशी भावना व्यक्त केली.
महाबळेश्वरात पार पडलेला हा प्रेरणादायी सोहळा महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला असून, समाजात सकारात्मक विचारांची आणि बदलाची नवी ऊर्जा निर्माण करणारा ठरल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.
Comments
Post a Comment