इराण–इस्राईल तणावाचा परिणाम? साताऱ्यात अफवांची धुमाकूळ; पेट्रोल मुबलक असल्याची प्रशासनाची खात्री
इराण–इस्राईल तणावाचा परिणाम? साताऱ्यात अफवांची धुमाकूळ; पेट्रोल मुबलक असल्याची प्रशासनाची खात्री
सातारा | प्रतिनिधी
मध्यपूर्वेत इस्राईल आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त होत असताना, त्याचे पडसाद सातारा शहरात अफवांच्या रूपाने उमटताना दिसत आहेत. “पेट्रोल लवकरच संपणार” अशा प्रकारचे संदेश सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दरम्यान, हारमुज जलडमरू परिसरात काही देशांची तेलवाहू जहाजे अडकल्याच्या बातम्या समोर आल्याने जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता निर्माण झाली आहे. मात्र, या घडामोडींचा भारतातील तात्काळ इंधन पुरवठ्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम झालेला नाही, असे अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आले आहे. देशात तसेच सातारा जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा साखळी सुरळीत सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
सातारा शहरातील सर्व पेट्रोल पंपांवर नियमितपणे इंधनाची आवक सुरू आहे. दररोज दोन टँकरद्वारे पेट्रोल-डिझेलचा पुरवठा केला जात असून कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाही, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. तरीही नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अफवांच्या पार्श्वभूमीवर काही नागरिकांकडून घरामध्ये कॅनमध्ये पेट्रोल साठवून ठेवण्याचे प्रकारही समोर येत आहेत. मात्र, अशा प्रकारे पेट्रोल साठवणे अत्यंत धोकादायक असून आग किंवा स्फोटाचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगून जबाबदारीने वर्तन करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना सातारा जिल्हा पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष रितेश रावखंडे यांनी सांगितले की, “साताऱ्यात पेट्रोलचा कोणताही तुटवडा नाही. सर्व पंपांवर मुबलक साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी नाहक भीती बाळगू नये आणि अफवांपासून दूर राहावे.”
अफवांपासून सावध राहा, प्रशासनाचे स्पष्ट आवाहन
सातारा शहरात पेट्रोल टंचाईबाबत पसरत असलेल्या अफवा पूर्णपणे निराधार आहेत. प्रत्यक्षात सर्व पेट्रोल पंपांवर पुरेसा साठा उपलब्ध असून नियमित पुरवठा सुरू आहे. नागरिकांनी सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये तसेच घरात पेट्रोल साठवण्यासारखे धोकादायक प्रकार टाळावेत, असे प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
Comments
Post a Comment