नवेनगर येथे रंगला ‘बाल आनंद मेळावा’; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला उजाळा
नवेनगर येथे रंगला ‘बाल आनंद मेळावा’; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला उजाळा
प्रतापगड प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील पारसोंड व शिरवली केंद्रातील शाळांचा संयुक्त ‘बाल आनंद मेळावा’ जिल्हा परिषद शाळा नवेनगर येथे उत्साहपूर्ण आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या या उपक्रमामुळे शैक्षणिक क्षेत्रात आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला.
या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य श्री. संजय केळगणे यांच्या हस्ते झाले. यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री. रमेश गंबरे, केंद्रप्रमुख श्री. विनायक पवार, माजी सरपंच श्री. सखाराम ढेबे, श्री. अनिल मोरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. विकास मोरे, अध्यक्षा सौ. नंदिनी सावंत यांच्यासह पारसोंड-शिरवली केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, उपशिक्षक, पालक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा परिषद शाळा कुंभरोशीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले इशस्तवन व स्वागत गीत यामुळे वातावरण भारावून गेले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. संजय केळगणे यांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकापुरते शिक्षण न ठेवता कृतीयुक्त शिक्षण, क्रीडा, योगाभ्यास आणि सांस्कृतिक उपक्रम यामधून स्वतःचा सर्वांगीण विकास साधण्याचे आवाहन केले. तसेच शिक्षणासोबतच संस्कार, शिस्त आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, विविध मनोरंजक खेळ, गाणी, नृत्य, नाटिका यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आपली कला, सर्जनशीलता आणि कौशल्य सादर केले. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत मार्गदर्शन केले.
या मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना, आत्मविश्वास, संघभावना आणि सर्जनशीलता विकसित होण्यास मोठी मदत झाली. तसेच विविध शाळांतील विद्यार्थ्यांना एकत्र येऊन परस्पर संवाद साधण्याची आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळाली.
दुपारच्या सत्रात सर्व विद्यार्थ्यांसाठी सुग्रास भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. भोजन व्यवस्थापनही शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले. कार्यक्रमाच्या शेवटी विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. विजेत्यांसोबत सहभागी सर्व विद्यार्थ्यांचेही कौतुक करण्यात आले.
संपूर्ण मेळावा उत्साहात आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंभरोशी शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय सोंडकर यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन पारसोंड केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री. शांताराम मोरे यांनी व्यक्त केले. या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment