अफवांना बळी पडू नका; साताऱ्यात इंधनाचा पुरेसा साठा – प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

अफवांना बळी पडू नका; साताऱ्यात इंधनाचा पुरेसा साठा – प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

सातारा प्रतिनिधी : 

आंतरराष्ट्रीय स्तरावरील आणि आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याच्या अफवा पसरवून काही घटकांकडून साठेबाजी किंवा काळाबाजार होण्याची शक्यता व्यक्त होत असताना, सातारा जिल्हा प्रशासनाने नागरिकांना स्पष्टपणे आवाहन केले आहे की, जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसल्याचे शासनस्तरावरून कळविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुरवठा शाखेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेसनोटमध्ये प्रशासन इंधन पुरवठ्यावर सतत लक्ष ठेवून असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

या संदर्भात BPCL आणि HPCL या तेल कंपन्यांच्या सेल्स ऑफिसर यांनी सातारा जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याची माहिती दिली आहे. काही पेट्रोल पंपांवर ‘अॅडव्हान्स पेमेंट’ प्रणालीमुळे तात्पुरता पुरवठा विस्कळीत झाल्याचे स्पष्ट करण्यात आले असून त्याचा इंधन टंचाईशी कोणताही संबंध नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच भीतीपोटी गरजेपेक्षा जास्त इंधन खरेदी करून साठवणूक करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनाने यावेळी कठोर इशाराही दिला असून युद्धजन्य परिस्थितीचा गैरफायदा घेत इंधनाची साठेबाजी करणे किंवा चढ्या दराने विक्री करणे हा जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत गंभीर गुन्हा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी आढळणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

तसेच सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही परिस्थितीत प्लास्टिकच्या बाटल्या, कॅन किंवा इतर अप्रमाणित कंटेनरमध्ये इंधन विक्री करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अशा प्रकारे इंधन साठवणे हे अत्यंत धोकादायक असून सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन ठरते. जर एखादा पंप चालक बाटलीत इंधन देताना किंवा साठेबाजी व काळाबाजार करताना आढळल्यास संबंधित पंपचालक आणि ग्राहक या दोघांवरही कोणतीही पूर्वसूचना न देता कठोर कारवाई केली जाईल. यामध्ये संबंधित पेट्रोल पंपाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची शिफारसही करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनास सहकार्य करावे तसेच इंधनासंदर्भातील कोणत्याही बेकायदेशीर प्रकाराची माहिती मिळाल्यास तात्काळ जिल्हा पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl