महाबळेश्वर पंचायत समितीची पहिलीच सभा ठरली दिशादर्शक; विकासकामांचा सखोल आढावा, जनहिताला प्राधान्य देण्याचा ठाम निर्धार
महाबळेश्वर पंचायत समितीची पहिलीच सभा ठरली दिशादर्शक; विकासकामांचा सखोल आढावा, जनहिताला प्राधान्य देण्याचा ठाम निर्धार
प्रतापगड प्रतिनिधी :
पंचायत समिती महाबळेश्वरची मासिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि. २७ मार्च २०२६ रोजी कै. एम. आर. भिलारे सभागृहात उत्साहपूर्ण आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. नवनिर्वाचित सभापती मा. सौ. शकुंतला रमेश चोरमले यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही पहिलीच सभा असल्याने सर्वांचे लक्ष या बैठकीकडे लागले होते. उपसभापती मा. श्री. संजय मोरे, पंचायत समिती सदस्य, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत सभा पार पडली.
सभेच्या प्रारंभीच नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांच्या बिनविरोध निवडीबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. पंचायत समिती सदस्य मा. सौ. वंदना भिलारे यांनी हा ठराव मांडला असून मा. श्री. संजय विठ्ठल शेलार यांनी त्यास अनुमोदन दिले. उपस्थित सदस्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात ठराव एकमताने मंजूर करत नव्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
यानंतर विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेताना विकासकामांच्या गतीवर विशेष भर देण्यात आला. बांधकाम विभागाने प्राप्त अनुदान, खर्च आणि प्रलंबित कामांची माहिती मांडत कामांची सद्यस्थिती स्पष्ट केली. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत गावनिहाय प्रगती सादर केली. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत असलेल्या गावांमध्ये तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. संबंधित गावांना पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन लोकांच्या समस्या समजून घेत त्वरित निराकरण करावे, अशी सूचना सभेतून देण्यात आली.
शिक्षण विभागाच्या आढाव्यात शिक्षक व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे हा गंभीर मुद्दा पुढे आला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ही पदे लवकरात लवकर भरण्यासाठी वरिष्ठ स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्याचे निर्देश देण्यात आले. आरोग्य विभागाने राबवलेल्या विविध योजनांचा, विशेषतः लसीकरण मोहिमेचा आढावा घेत त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. प्रभावी कामगिरीबद्दल आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. पशुसंवर्धन विभागाच्या योजनांबाबत सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी सविस्तर उत्तरे देत शंकानिरसन केले.
गट विकास अधिकारी श्री. विजय विभुते यांनी प्रशासनाच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत सभेला मार्गदर्शन केले. सर्व विभागांनी समन्वय साधून जनतेची कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत पारदर्शक, उत्तरदायी आणि गतिमान प्रशासन उभे करणे हीच काळाची गरज आहे,” असा संदेश यावेळी देण्यात आला.
सभेत सर्व सदस्यांनीही प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करत ग्रामीण भागातील मूलभूत समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. विकासकामांची अंमलबजावणी वेळेत आणि गुणवत्तापूर्ण व्हावी, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
सभेच्या शेवटी सेवानिवृत्त होत असलेले सहाय्यक गट विकास अधिकारी श्री. रामचंद्र जगताप यांचा सत्कार करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सभेचे कामकाज श्री. प्रभाकर शेंडे, श्री. दिनकर जाधव आणि श्री. श्रीकांत धनवडे यांनी पाहिले. विस्तार अधिकारी (कृषी) श्री. रमेश ओव्हाळ यांनी उपस्थितांचे आभार मानत सभापतींच्या परवानगीने सभेची सांगता केली.
नव्या नेतृत्वाखाली झालेली ही पहिलीच सभा विकासाभिमुख निर्णय, प्रशासनातील समन्वय आणि जनतेच्या प्रश्नांबाबतची संवेदनशीलता यामुळे विशेष ठरली. आगामी काळात पंचायत समितीच्या कामकाजाला अधिक वेग आणि दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment