महाबळेश्वर तालुक्याची घरकुल योजनांत झेप; कातकरी समाजापासून सर्वसामान्यांपर्यंत ‘स्वप्नातील घर’ साकार
महाबळेश्वर तालुक्याची घरकुल योजनांत झेप; कातकरी समाजापासून सर्वसामान्यांपर्यंत ‘स्वप्नातील घर’ साकार
महाबळेश्वर प्रतिनिधी :
सातारा जिल्ह्यात घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असतानाच महाबळेश्वर तालुक्याने या कामगिरीत विशेष ठसा उमटवला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध घरकुल योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात तालुक्याने उल्लेखनीय यश मिळवले असून, प्रशासनाच्या नियोजनबद्ध कामकाजामुळे अनेक कुटुंबांचे ‘स्वतःच्या घराचे स्वप्न’ साकार होत आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्पा क्रमांक एकमध्ये उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर टप्पा क्रमांक दोनमध्येही सातारा जिल्ह्याने भरीव प्रगती साधली आहे. एकूण ८७४ घरकुलांच्या उद्दिष्टापैकी ६२४ घरकुले पूर्ण झाली असून उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत. या सर्व प्रक्रियेत महाबळेश्वर तालुक्याचा वाटा लक्षणीय राहिला आहे.
विशेषतः कातकरी समाजासाठी राबविण्यात आलेल्या पीएम जनमन घरकुल आवास योजनेत महाबळेश्वर तालुक्याने शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करत आदर्श निर्माण केला आहे. तालुक्याला मिळालेल्या ४५ घरांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत सर्व ४५ घरांना मंजुरी देण्यात आली असून, बांधकामाची कामेही सुरळीतपणे सुरू आहेत. केवळ मंजुरी देण्यापुरते मर्यादित न राहता लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, तांत्रिक मार्गदर्शन आणि बांधकाम प्रक्रियेत सातत्याने मदत करणे या सर्व बाबींमध्ये पंचायत समिती महाबळेश्वरने सक्रिय भूमिका बजावली आहे.
या यशामागे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय विभुते आणि विस्तार अधिकारी विठ्ठल पवार यांचे नेतृत्व व नियोजन महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रशासनाने एकसंधपणे काम करत योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. अधिकाऱ्यांची तत्परता, नियमित पाठपुरावा आणि लाभार्थ्यांशी थेट संवाद यामुळे कामांना गती मिळाली असून नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल विश्वासही वाढला आहे.
याचबरोबर राज्य शासनाच्या रमाई घरकुल योजना, मोदी आवास योजना, यशवंत घरकुल योजना तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना या योजनांमध्येही तालुक्याने समाधानकारक कामगिरी केली आहे. सर्व योजनांची उद्दिष्टे पूर्ण करण्याकडे प्रशासनाचा भर असून, रमाई आवास योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या १७ घरकुलांचे कामही सध्या प्रगतीपथावर आहे. या योजनांमुळे सामाजिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा आधार मिळत आहे.
महाबळेश्वरसारख्या डोंगराळ व भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक भागात घरकुलांची उभारणी करणे ही मोठी जबाबदारी असतानाही प्रशासनाने ती यशस्वीपणे पार पाडली आहे. स्थानिक पातळीवरील समन्वय, ग्रामपंचायतींचे सहकार्य आणि नागरिकांचा सहभाग यामुळे या योजनांना अधिक बळ मिळाले आहे.
घरकुल योजनांच्या या प्रभावी अंमलबजावणीमुळे अनेक कुटुंबांचे आयुष्य बदलत असून, सुरक्षित आणि सन्मानाचे जीवन जगण्याचा मार्ग खुला झाला आहे. महाबळेश्वर तालुक्याने केलेली ही उल्लेखनीय कामगिरी इतर तालुक्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, भविष्यातही अशाच प्रकारे लोकाभिमुख योजनांची यशस्वी अंमलबजावणी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Comments
Post a Comment