अंबवडेचा ‘वनाश्रम’ ठरला राज्यासाठी आदर्श; वृक्ष पुनर्वसनाचा पहिलाच यशस्वी प्रयोग
अंबवडेचा ‘वनाश्रम’ ठरला राज्यासाठी आदर्श; वृक्ष पुनर्वसनाचा पहिलाच यशस्वी प्रयोग
✍️विजय जाधव,
सातारा प्रतिनिधी :
विकासकामांच्या नावाखाली झाडांची तोड ही सर्वत्र पाहायला मिळते, मात्र कोरेगाव तालुक्यातील अंबवडे (संमत वाघोली) येथे याला एक सकारात्मक पर्याय उभा राहिला आहे. येथील ग्रामस्थ, प्रशासन आणि विविध यंत्रणांच्या संयुक्त प्रयत्नातून उभारण्यात आलेला ‘वनाश्रम’ हा प्रकल्प सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेत असून वृक्षांचे एकत्रित पुनर्वसन करणारा हा महाराष्ट्रातील पहिलाच यशस्वी प्रयोग ठरत आहे.
जागतिक वन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या भव्य वृक्ष पुनर्रोपण कार्यक्रमात या उपक्रमाचा गौरव करण्यात आला. यावेळी सह्याद्री देवराई फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेते सयाजी शिंदे यांनी उपस्थित राहून या प्रयोगाचे कौतुक केले. “पुनर्वसित गावांचे पुनर्वसन आपण पाहतो, पण झाडांचे एकत्रित पुनर्वसन करून त्यांचा ‘वनाश्रम’ उभा राहिलेला हा पहिलाच अनुभव आहे. झाडांना नवी पालवी फुटत असून भविष्यात हा परिसर हिरवागार होऊन पुढील पिढ्यांना आधार देईल,” असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी संतोष पाटील, वनविभागाचे अमोल सातपुते, नॅशनल हायवेचे वरिष्ठ अधिकारी संजय कदम, सरपंच शुभांगी सकुंडे, उपसरपंच दत्तात्रय लांडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले की, सातारा ते लोणंद या राजमार्गाच्या कामामुळे अडथळा ठरणारी अनेक जुनी झाडे तोडण्याऐवजी शास्त्रीय पद्धतीने त्यांचे पुनर्रोपण करण्यात आले. या प्रक्रियेत झाडांचे संरक्षण करत त्यांना नव्या जागी स्थलांतरित करण्यात आले, जे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.
नॅशनल हायवे प्राधिकरण, वनविभाग, सह्याद्री देवराई प्रकल्प आणि अंबवडे ग्रामस्थ यांच्या समन्वयातून हा ‘वनाश्रम’ साकार झाला आहे. विशेषतः सरपंच शुभांगी सकुंडे यांच्या पुढाकारामुळे या प्रकल्पाला गती मिळाली. गावातील महिला, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत वृक्ष पुनर्रोपण मोहिमेला यशस्वी केले.
रस्ते विकासामुळे बाधित होणाऱ्या झाडांना एकत्रितपणे सुरक्षित ठिकाणी ‘आश्रम’ देऊन त्यांचे जतन करण्याची ही संकल्पना राज्यासाठी मार्गदर्शक ठरत आहे. विकास आणि पर्यावरण यामध्ये समतोल राखण्याचा संदेश देणारा हा प्रकल्प भविष्यात इतर ठिकाणीही राबवला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment