धुक्याची शुभ्र चादर, गुलाबी थंडीची मिठी — महाबळेश्वर बनले पर्यटकांचे स्वर्गद्वार!
धुक्याची शुभ्र चादर, गुलाबी थंडीची मिठी — महाबळेश्वर बनले पर्यटकांचे स्वर्गद्वार! प्रतापगड प्रतिनिधी , दि. २४ मे : देशभरात उन्हाच्या झळा असह्य होत असताना सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या महाबळेश्वरने मात्र निसर्गाच्या अनोख्या सौंदर्याची उधळण सुरू केली आहे. दाट धुक्याची शुभ्र चादर, गुलाबी थंडीचा मंद स्पर्श आणि रिमझिम पावसाच्या हलक्या सरींनी संपूर्ण परिसर जणू एखाद्या स्वप्नचित्रासारखा बहरून गेला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये येथे दाखल होणाऱ्या पर्यटकांना हे निसर्गवैभव अक्षरशः थक्क करून सोडत आहे. धुक्याचे अद्भुत साम्राज्य गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वरच्या आकाशात पहाटेपासूनच धुक्याने आपले अधिराज्य प्रस्थापित केले आहे. उंचच उंच डोंगररांगा, खोल दऱ्याखोऱ्या, घनदाट वृक्षराजी आणि नयनरम्य पर्यटनस्थळे — सारे काही धुक्याच्या शुभ्र पडद्याआड लपून जाते आणि काही क्षणांनी पुन्हा हळुवारपणे उलगडते. हे क्षणाक्षणाला बदलणारे दृश्य पाहण्यासाठी पर्यटक विविध पॉइंट्सवर मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. धुक्यातून डोकावणारे हिरवेगार निसर्गचित्र प्रत्येकाच्या मनावर अनामिक मोहिन...