पाचगणीत कऱ्हाडकर गटाला मोठा धक्का; २५ वर्षांचे विश्वासू सहकारी प्रवीण बोधे राष्ट्रवादीत, राजकीय वर्तुळात खळबळ
पाचगणीत कऱ्हाडकर गटाला मोठा धक्का; २५ वर्षांचे विश्वासू सहकारी प्रवीण बोधे राष्ट्रवादीत, राजकीय वर्तुळात खळबळ
पाचगणी प्रतिनिधी :
पाचगणीच्या राजकीय पटलावर मोठी उलथापालथ घडवून आणणारी घटना समोर आली असून माजी नगराध्यक्षा लक्ष्मीताई कऱ्हाडकर यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रवीण गजानन बोधे यांनी अखेर कऱ्हाडकर गटाची तब्बल २५ वर्षांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. दीर्घकाळ एकाच नेतृत्वाशी एकनिष्ठ राहिलेल्या बोधे यांच्या या निर्णयामुळे पाचगणीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून कऱ्हाडकर गटासाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
सातारा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते प्रवीण बोधे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला पाचगणीचे नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे, आघाडी प्रमुख शेखर कासुर्डे, नगरसेवक नारायण बिरामणे, राजेंद्र पारठे, महेश खांडके तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्षप्रवेशानंतर बोलताना मंत्री मकरंद आबा पाटील यांनी नाव न घेता कऱ्हाडकर गटावर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले की, एखादा कार्यकर्ता तब्बल पंचवीस वर्षे एकनिष्ठपणे काम करत असेल, नगरसेवक म्हणून जबाबदारी पार पाडत असेल आणि तरीही त्याला न्याय मिळत नसेल, तर ते दुर्दैवी आहे. राजकारणात प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची उपेक्षा होऊ नये. प्रवीण बोधे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्यांना पक्षात योग्य तो सन्मान, जबाबदारी आणि संधी दिली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना प्रवीण बोधे यांनी पाचगणीतील बदलते राजकीय वातावरण आणि शहरात सुरू असलेली विकासकामे हे आपल्या निर्णयामागील प्रमुख कारण असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून शहरात सुरू असलेली विकासकामांची गती आणि मंत्री मकरंद आबा पाटील यांचे विकासाभिमुख नेतृत्व यामुळे आपण प्रभावित झालो असून त्यांच्यावर विश्वास ठेवूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रवीण बोधे हे मूळचे शिवसेनेचे पदाधिकारी असले तरी स्थानिक राजकारणात त्यांनी गेल्या पंचवीस वर्षांपासून लक्ष्मीताई कऱ्हाडकर यांच्या नेतृत्वाला अखंड पाठिंबा दिला होता. कऱ्हाडकर गटाच्या प्रत्येक राजकीय लढाईत ते आघाडीवर राहिले. निवडणुका असोत किंवा संघटनात्मक जबाबदाऱ्या, बोधे यांनी कायम निष्ठेने काम केले. मात्र इतकी वर्षे प्रामाणिकपणे साथ देऊनही अपेक्षित सन्मान आणि न्याय मिळाला नसल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली होती. याच नाराजीमधून त्यांनी अखेर वेगळा राजकीय मार्ग स्वीकारल्याची चर्चा पाचगणीच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
प्रवीण बोधे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे पाचगणी नगरपालिकेतील आगामी राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कऱ्हाडकर गटातील प्रभावी आणि जनसंपर्क असलेल्या चेहऱ्याने पक्षांतर केल्याने स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याचे संकेत मिळत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी बळकटी देणारा ठरणार की पाचगणीतील राजकीय संघर्ष अधिक तीव्र करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment