SIR-२०२६ मध्ये परभणी जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून कौतुक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
SIR-२०२६ मध्ये परभणी जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून कौतुक
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
✍️उत्तम लोखंडे ,
परभणी प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण-२०२६ (SIR) मोहिमेत परभणी जिल्ह्याने राज्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्ह्याच्या या कामगिरीचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी कौतुक केले. आगामी टप्प्यातील कामकाज अधिक पारदर्शक, अचूक आणि दक्षतेने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.
विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षणांतर्गत परभणी जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी या चारही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव, पत्ता तसेच इतर तपशील मतदारांनी काळजीपूर्वक तपासावेत. नावामध्ये काही त्रुटी आढळल्यास अथवा पात्र असूनही मतदार यादीत नाव समाविष्ट नसल्यास संबंधित मतदारांना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत विहित नमुन्यात दावे व हरकती दाखल करता येणार आहेत.
प्राप्त दावे व हरकतींची सुनावणी घेऊन त्यावर निर्णय घेण्याची प्रक्रिया २९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांनी निर्धारित कालावधीत मतदार यादीची पडताळणी करून आवश्यक असल्यास दावे किंवा हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दावे-हरकतींच्या सुनावणीबाबत अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
विशेष सखोल पुनरिक्षणाच्या पुढील टप्प्यातील कामकाजाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार नोंदणी अधिकारी आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये दावे व हरकतींची प्रक्रिया, नो-मॅपिंग, अनोमली प्रकरणांतील मतदारांच्या सुनावणीसह कागदपत्रांची पडताळणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, संगीता चव्हाण, शैलेश लाहोटी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भोन्सीकर यांच्यासह मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.
‘अंतिम मतदार यादी अचूक आणि पारदर्शक असावी’
जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सांगितले की, विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षणाच्या पुढील टप्प्यातील कामकाज अत्यंत महत्त्वाचे आणि जबाबदारीचे आहे. भारत निवडणूक आयोग तसेच महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या सर्व निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
प्राप्त दावे व हरकतींच्या सुनावणीची कार्यपद्धती संबंधित अधिकाऱ्यांनी व्यवस्थित समजून घ्यावी. प्रत्येक प्रकरणातील कागदपत्रांची योग्य पद्धतीने पडताळणी करून निर्णय घ्यावा. अंतिम मतदार यादी पारदर्शक, अचूक आणि त्रुटीविरहित राहील, याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होईल, तसेच कोणत्याही अपात्र व्यक्तीचा समावेश होणार नाही, यासाठी सर्व संबंधितांनी काळजीपूर्वक काम करावे, असेही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी स्पष्ट केले.
उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून सविस्तर मार्गदर्शन
उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार यांनी प्रशिक्षणार्थींना विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षणांतर्गत पुढील टप्प्यात करण्यात येणाऱ्या विविध कामांबाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. दावे व हरकतींची हाताळणी, सुनावणी प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची तपासणी आणि संबंधित प्रकरणांमध्ये घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
मतदारांनी प्रारूप यादी तपासण्याचे आवाहन
दरम्यान, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी परभणी जिल्ह्यातील सर्व मतदारांना आवाहन केले आहे की, SIR-२०२६ अंतर्गत प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत आपले नाव, पत्ता आणि इतर तपशील तपासावेत. नाव नसल्यास किंवा तपशिलात काही त्रुटी असल्यास निर्धारित मुदतीत विहित नमुन्यात दावे अथवा हरकती दाखल कराव्यात.
लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक पात्र नागरिकाचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी मतदार यादी अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून आपली नोंद तपासावी आणि आवश्यक दुरुस्ती अथवा नाव नोंदणीसाठी वेळेत अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment