शिक्षक भरतीपूर्वी कार्यरत शिक्षकांना जिल्हांतर्गत बदलीची एक संधी द्या सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांना साकडे; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या स्तरावरही पाठपुराव्याची मागणी

शिक्षक भरतीपूर्वी कार्यरत शिक्षकांना जिल्हांतर्गत बदलीची एक संधी द्या

सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांना साकडे; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या स्तरावरही पाठपुराव्याची मागणी

✍️संजय सकपाळ,

तळदेव प्रतिनिधी : 

पवित्र पोर्टलअंतर्गत नव्याने शिक्षक भरती होण्यापूर्वी सातारा जिल्ह्यात सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांना जिल्हांतर्गत बदलीची एक विशेष संधी देण्यात यावी, अशी मागणी सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्याकडे केली.

यासंदर्भात २१ जून २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार शिक्षक भरतीतील नव्या शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी जिल्ह्यात कार्यरत शिक्षकांना जिल्हांतर्गत बदलीची संधी देण्याची तरतूद असल्याचे शिक्षक संघाने निदर्शनास आणून दिले. त्यामुळे शासन निर्णयाची अंमलबजावणी करून सातारा जिल्ह्यात बदली प्रक्रिया राबवावी, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

जिल्हा परिषद स्तरावर या प्रक्रियेत काही प्रशासकीय अडचणी असल्यास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत चर्चा करून आपल्या स्तरावरून विशेष प्रयत्न करावेत, अशी विनंतीही शिष्टमंडळाने डॉ. शिंदे यांच्याकडे केली.

जनगणनेचे कारण देऊन बदलीची संधी थांबवू नये

शिक्षक संघाच्या म्हणण्यानुसार, जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यास अद्याप काही कालावधी आहे. या बदल्या सार्वत्रिक किंवा नियमित बदल्या नसून, नव्याने होणाऱ्या शिक्षक भरतीपूर्वी जिल्ह्यात कार्यरत शिक्षकांसाठीची विशेष बदली प्रक्रिया आहे. त्यामुळे जनगणनेचे कारण लक्षात घेऊन ही संधी पूर्णपणे रोखू नये, तर आवश्यक त्या विशिष्ट अटी व निकषांच्या आधारे बदली प्रक्रिया राबवावी, अशी भूमिका संघटनेने मांडली.

सातारा जिल्ह्यातील अनेक दुर्गम व अवघड क्षेत्रांमध्ये महिला शिक्षकांसह अनेक शिक्षक दीर्घकाळ सेवा बजावत आहेत. जिल्हांतर्गत बदलीची ही विशेष संधी मिळाल्यास अशा शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, नव्या शिक्षकांची भरती झाल्यानंतर त्यांना पदस्थापना देण्यात आली आणि त्यापूर्वी कार्यरत शिक्षकांना बदलीची संधी मिळाली नाही, तर संबंधित शिक्षकांवर अन्याय होण्याची शक्यता आहे, असे संघटनेने स्पष्ट केले.

त्यामुळे नवीन शिक्षकांची पदस्थापना करण्यापूर्वी विद्यमान शिक्षकांना एकदा जिल्हांतर्गत बदलीची संधी देऊन त्यानंतरच भरतीतील शिक्षकांना पदस्थापना द्यावी, अशी मागणी शिक्षक संघाने केली आहे.

जिल्हा परिषदेने पुढाकार घेण्याची मागणी

शिक्षकांच्या या प्रश्नात सातारा जिल्हा परिषदेने सकारात्मक भूमिका घेत पुढाकार घ्यावा, तसेच शासन निर्णयाच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही सुरू करावी, अशी अपेक्षा शिष्टमंडळाने व्यक्त केली. विशेषतः दुर्गम भागात कार्यरत शिक्षक, महिला शिक्षक आणि कौटुंबिक तसेच प्रशासकीय अडचणींमुळे बदलीची प्रतीक्षा करणाऱ्या शिक्षकांसाठी ही संधी महत्त्वाची असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी सातारा जिल्हा शिक्षक संघाचे नेते बलवंत पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, सरचिटणीस दत्ता पाटील, हनुमंत रसाळ, स्वाती चव्हाण, बी. एस. कणसे, राजेंद्र बोराटे, विजय ढमाळ, दीपक गिरी, विजय खरात, सूर्यकांत कदम, ज्ञानबा ढापरे, प्रदीप रवलेकर, शहाजी जाधव, शांताराम सस्ते, हणमंत चिंचकर, सागर माने, सागर जाधव, प्रथमेश सावंत, संतोष खेडकर, हणमंत यादव, विकास गोडसे, अविनाश कापसे तसेच सर्व तालुकाध्यक्ष भानुदास राऊत, मनोहर माने, धनंजय सोनवलकर, सुरज तुपे, जयकर खाडे, भालचंद्र थोरात, रविंद्र भिलारे, बंडू पवार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिक्षक भरतीपूर्वी कार्यरत शिक्षकांना जिल्हांतर्गत बदलीची संधी मिळणार का, याकडे आता सातारा जिल्ह्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl