२४ वर्षांपासून रखडलेल्या रस्त्यामुळे पश्चिम हातलोट–बिरमणी घाटरस्त्यासाठी आता निर्णायक लढा; ६ सप्टेंबरच्या मुंबई मेळाव्याला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाबळेश्वर व खेड तालुक्यातील गावांच्या विकासाला ब्रेक; पुढील पिढ्यांसाठी रस्ता पूर्ण करण्यासाठी जनमताचा रेटा उभारण्याचा निर्धार


२४ वर्षांपासून रखडलेल्या रस्त्यामुळे पश्चिम हातलोट–बिरमणी घाटरस्त्यासाठी आता निर्णायक लढा; ६ सप्टेंबरच्या मुंबई मेळाव्याला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

महाबळेश्वर व खेड तालुक्यातील गावांच्या विकासाला ब्रेक; पुढील पिढ्यांसाठी रस्ता पूर्ण करण्यासाठी जनमताचा रेटा उभारण्याचा निर्धार

मुंबई प्रतिनिधी :

महाबळेश्वर तालुक्याच्या पश्चिम भागातील तसेच खेड तालुक्यातील अनेक गावांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा महाबळेश्वर–हातलोट–बिरमणी–खेड घाटरस्ता गेल्या तब्बल २४ वर्षांपासून रखडलेला आहे. या रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी आता दोन्ही तालुक्यातील मुंबईकर ग्रामस्थांनी एकत्र येत निर्णायक पाठपुरावा करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता मुंबईतील कोळडोंगरी, अंधेरी पूर्व येथे सर्व मुंबईकर ग्रामस्थांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

महाबळेश्वर तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक गावे आजही मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक गावे केवळ सणासुदीच्या काळात गजबजलेली दिसतात; मात्र सण संपल्यानंतर पुन्हा ओस पडतात. उपलब्ध असलेल्या मोजक्या शिक्षण संस्थांनाही विद्यार्थ्यांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. वैद्यकीय सुविधांची परिस्थितीही समाधानकारक नसल्याने नागरिकांना उपचारांसाठी बाहेरच्या शहरांकडे धाव घ्यावी लागते.

स्थलांतरामुळे गावांची लोकसंख्या घटली

विकासाच्या मूलभूत सुविधा गावांपर्यंत पोहोचल्या नसल्याने रोजगार, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधांसाठी अनेक कुटुंबांनी मुंबई, पुणे आणि इतर शहरांकडे स्थलांतर केले. या भागाची भौगोलिक रचना आणि दळणवळणाच्या मर्यादा यामुळे अनेक पिढ्यांनी परिस्थिती बदलण्यासाठी संघर्ष केला; मात्र अपेक्षित विकास अद्याप मोठ्या प्रमाणात दूरच राहिला आहे.

महाबळेश्वर तालुक्याच्या ग्रामीण भागासाठी ‘नवीन महाबळेश्वर’ या विकासाच्या संकल्पनेमुळे आशेचा किरण निर्माण झाला होता. मात्र पश्चिम भागातील सुमारे २५ गावांना इको सेन्सिटिव्ह झोनच्या कारणामुळे या विकास प्रक्रियेत अपेक्षित समावेश मिळू शकला नाही. त्यामुळे या गावांच्या सर्वांगीण विकासासाठी महाबळेश्वर–हातलोट–बिरमणी–खेड रस्ता हा महत्त्वाचा आणि कदाचित शेवटचा पर्याय असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

२००२ मध्ये झाले भूमिपूजन

कोकणचे ज्येष्ठ नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या प्रेरणेतून या घाटरस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. २००२ मध्ये बिरमणी येथे या घाटरस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर गेल्या २४ वर्षांत रस्त्याच्या कामासाठी अनेकांनी प्रयत्न केले.

खेड तालुक्यातील ॲड. वामन गांजेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. रामदासभाई कदम यांचा भक्कम पाठिंबा यामुळे या कामाने काही टप्पे पार केले. मात्र गेल्या काही वर्षांत पाठपुरावा कमी पडल्याने आणि प्रशासकीय प्रक्रियेला अपेक्षित गती न मिळाल्याने हा रस्ता अद्याप पूर्णत्वास गेलेला नाही.

योगेश कदम, मकरंद पाटील यांच्याकडून सकारात्मक भूमिका

रस्ता पूर्ण करण्यासाठी सध्या नामदार योगेश कदम सकारात्मक असून, आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे. तसेच वाई–महाबळेश्वरचे आमदार आणि मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांचीही या रस्त्याच्या कामाबाबत सकारात्मक भूमिका असल्याचे सांगण्यात आले.

२१ मे २०२६ रोजी नामदार योगेश कदम यांच्या दालनात या रस्त्याच्या कामासंदर्भात अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेण्यात आली होती. या बैठकीस कोकण विकास समितीचे अध्यक्ष जयवंतराव दरेकर, हातलोट येथून ग्रामस्थांचे प्रतिनिधी व सहकारी तसेच बिरमणी येथील प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत रस्त्याच्या कामातील प्रशासकीय दिरंगाईबाबत मंत्री कदम यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याचे सांगण्यात आले. एका छोट्याशा टेंडरसाठी सहा वर्षे का लागतात?, असा थेट सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.

‘अधिकाऱ्यांच्या मागे लागण्यासाठी जनमताचा रेटा हवा’

या बैठकीतून मंत्री योगेश कदम हे रस्ता पूर्ण करण्यासाठी सकारात्मक आणि सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले. मात्र केवळ मंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेने प्रश्न सुटणार नसून, दोन्ही तालुक्यातील ग्रामस्थांचे जनमत आणि १० ते १५ सक्रिय कार्यकर्त्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा प्रशासनावर राहणे अत्यावश्यक आहे, अशी भूमिका आयोजकांनी मांडली आहे.

रस्ता पूर्ण होण्यासाठी प्रशासनाच्या प्रत्येक टप्प्यावर पाठपुरावा करण्यासाठी ग्रामस्थांनी संघटित होणे गरजेचे असल्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

रस्ता पूर्ण झाला तर अनेक गावांचा कायापालट

महाबळेश्वर–हातलोट–बिरमणी–खेड हा मार्ग केवळ हातलोट आणि बिरमणी या दोन गावांना जोडणारा रस्ता नाही. हा मार्ग पूर्ण झाल्यास महाबळेश्वर आणि खेड या दोन्ही तालुक्यांतील रस्त्यालगत असलेल्या अनेक गावांच्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यटन आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळू शकते.

दळणवळण सुधारल्यास गावांमधून होणारे स्थलांतर कमी होण्यास मदत होऊ शकते. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध होऊ शकतात. वैद्यकीय सुविधा, रोजगार आणि बाजारपेठांशी संपर्क वाढू शकतो. स्थानिक पर्यटन आणि कृषीपूरक व्यवसायांनाही याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

६ सप्टेंबरला मुंबईत ग्रामस्थांचा मेळावा

या पार्श्वभूमीवर दोन्ही तालुक्यातील मुंबईकर ग्रामस्थांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

स्थळ : मुंबई पब्लिक स्कूल, महापालिका स्कूल, नित्यानंद मार्ग, गरवारे कंपनीसमोर, सहार रोड, कोळडोंगरी, अंधेरी पूर्व, मुंबई – ४०००६९
दिनांक : रविवार, ६ सप्टेंबर २०२६
वेळ : सायंकाळी ४.३० वाजता

अंधेरी पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरून गरवारे चौकासाठी ऑटोची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे.

महाबळेश्वर तालुका कोयना खोरे विकास मंडळ, कोकण विकास समिती तसेच महाबळेश्वर आणि खेड तालुक्यातील विविध मुंबईकर ग्रामस्थ मंडळांच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

‘पुढच्या पिढीसाठी संघर्ष करूया’

सह्याद्रीच्या या भूमीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून संघर्ष, पराक्रम आणि जिद्दीची परंपरा पाहिली आहे. त्याच सह्याद्रीच्या कुशीत राहणाऱ्या गावांच्या पुढील पिढ्यांसाठी आता पुन्हा एकदा संघटित संघर्ष करण्याची वेळ आली आहे, असा संदेश आयोजकांनी दिला आहे.

हातलोट–बिरमणी घाटरस्ता हा केवळ रस्ता नसून, तो अनेक गावांच्या भवितव्याचा आणि पुढील पिढ्यांच्या विकासाचा मार्ग आहे. त्यामुळे ६ सप्टेंबरच्या मेळाव्यास प्रत्येक गावातून जास्तीत जास्त ग्रामस्थांनी उपस्थित राहून आपली एकजूट दाखवावी, असे नम्र आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl