नूतन महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न विविध परीक्षांसह क्रीडा क्षेत्रातील गुणवंतांचा रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्र देऊन गौरव
नूतन महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
विविध परीक्षांसह क्रीडा क्षेत्रातील गुणवंतांचा रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्र देऊन गौरव
उत्तम लोखंडे
सेलू प्रतिनिधी :
सेलू, जि. परभणी येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचलित नूतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘गुणवत्ता सन्मान पारितोषिक वितरण सोहळा २०२६’ उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया होते. प्रमुख अतिथी म्हणून बालाजी मगर, सह दुय्यम निबंधक, नोंदणी व मुद्रांक विभाग, सेलू तसेच चेतन बाहेती, व्यवस्थापकीय संचालक, कोहिनूर रोप्स प्रा. लि., सेलू उपस्थित होते.
यावेळी मंचावर दत्तरावजी पावडे नाना, उपप्राचार्य डॉ. आर. एम. खाडप, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. आर. ए. झोडगे, प्रा. व्ही. आर. टेंगसे, प्रा. पी. आर. पांडे, पर्यवेक्षक प्रा. पी. एस. सोनवणे, प्रा. ए. टी. मदने आणि प्रा. मिलिंद झमकडे यांची उपस्थिती होती.
या गौरव सोहळ्यात विविध परीक्षांमध्ये तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव हा केवळ पुरस्कार नसून त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि सामाजिक वाटचालीसाठी प्रेरणादायी ऊर्जा देणारा उपक्रम असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे त्यांच्या परिश्रम, सातत्य, जिद्द आणि अभ्यासू वृत्तीचे फलित आहे. त्याचबरोबर शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि संस्थेने उपलब्ध करून दिलेले शैक्षणिक वातावरण यांचाही विद्यार्थ्यांच्या यशात महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशावर न थांबता भविष्यात ज्ञान, कौशल्य, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी यांच्या माध्यमातून समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन मान्यवरांनी केले.
कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, पुरस्कारांचे प्रायोजक, संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बी. एस. धामणगावकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. विकास गवई यांनी मानले.
Comments
Post a Comment