रघुवीर घाटात दरड कोसळली; १६ गावांचा संपर्क तुटला!२४ तासांपासून एसटी अडकून; महाकाय दगड हटविण्यास अडथळा, ब्लास्टिंगच्या मदतीने मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू
रघुवीर घाटात दरड कोसळली; १६ गावांचा संपर्क तुटला!
२४ तासांपासून एसटी अडकून; महाकाय दगड हटविण्यास अडथळा, ब्लास्टिंगच्या मदतीने मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू
कांदाटी प्रतिनिधी :
रघुवीर घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने महाबळेश्वर तालुक्यातील तब्बल १६ गावांचा खेड तालुक्याशी संपर्क तुटला आहे. दरड कोसळून रस्ता पूर्णपणे बंद झाल्याने गेल्या २४ तासांपासून एसटी बस घाटातच अडकून पडली आहे. रस्त्यावर मोठमोठे दगड आल्याने जेसीबीच्या सहाय्याने मार्ग मोकळा करण्यात अडचणी येत असून, आता ब्लास्टिंगच्या माध्यमातून हे दगड हटविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रघुवीर घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळून रस्त्यावर माती, दगड आणि मोठे खडक आले आहेत. त्यामुळे घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या घटनेचा फटका घाटाच्या परिसरातील १६ गावांना बसला असून, नागरिकांचा खेड तालुक्याशी असलेला दैनंदिन संपर्क विस्कळीत झाला आहे. प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार तसेच अत्यावश्यक कामांसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
दरड कोसळल्याची माहिती मिळताच प्रशासनाकडून सकाळी जेसीबी घटनास्थळी पाठविण्यात आली. मात्र रस्त्यावर पडलेले दगड आकाराने अत्यंत मोठे असल्याने ते केवळ जेसीबीच्या सहाय्याने हटविणे कठीण होत आहे. त्यामुळे रस्ता मोकळा करण्यासाठी ब्लास्टिंगची गाडी घटनास्थळी आणण्यात येत असून, मोठे दगड नियंत्रित पद्धतीने हटविण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
दरम्यान, रघुवीर घाट रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत येत असल्याने संबंधित विभागाशी तातडीने संपर्क साधण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना भूषण मोरे (शिंदी) यांनी सांगितले की, त्यांनी सकाळी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाला तातडीने रस्ता मोकळा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
रस्त्यावर पडलेले मोठे दगड हटविण्यासाठी ब्लास्टिंगची आवश्यकता असल्याने रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला होण्यास काही वेळ लागू शकतो. मात्र १६ गावांचा संपर्क तुटल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे प्रशासनाने उपलब्ध यंत्रणा आणि मनुष्यबळाचा वापर करून युद्धपातळीवर काम हाती घेऊन रस्ता लवकरात लवकर खुला करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, रस्ता बंद असल्याने एसटी वाहतूकही प्रभावित झाली असून, गेल्या २४ तासांपासून एसटी बस घटनास्थळी अडकून आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय वाढली आहे. रघुवीर घाटातील परिस्थिती लक्षात घेता संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही पूर्ण करून वाहतूक सुरळीत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
१६ गावांचा संपर्क पूर्ववत होण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून सुरू असलेली रस्ता मोकळा करण्याची कार्यवाही आता कितपत वेगाने पूर्ण होते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment