प्रादेशिक पर्यटन आराखड्यातील कामांना गती द्या; मार्च पर्यंत कामे पूर्ण करा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना; पर्यटनवाढीसह स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार
प्रादेशिक पर्यटन आराखड्यातील कामांना गती द्या; मार्चपर्यंत कामे पूर्ण करा
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना; पर्यटनवाढीसह स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार
सातारा प्रतिनिधी :
जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी प्रादेशिक पर्यटन आराखड्यांतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या आराखड्यातील सुरू असलेली सर्व कामे गतीने, मुदतीत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
प्रादेशिक पर्यटन आराखड्यातील विविध सुरू असलेल्या कामांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, उपवन संरक्षक अमोल सातपुते, अपर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने मोठी क्षमता असून, उपलब्ध पर्यटनस्थळांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन आराखड्यांतर्गत विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होणार असून, पर्यटनावर आधारित स्थानिक व्यवसायांनाही मोठी चालना मिळणार आहे. त्यातून स्थानिक नागरिकांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, असे पालकमंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.
आराखड्यातील कामे पूर्ण करण्यासाठी वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने परस्पर समन्वयाने काम करावे, तसेच कामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी. सुरू असलेली कामे येत्या मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्ह्यातील पर्यटन विकासामध्ये जल पर्यटनालाही विशेष महत्त्व आहे. त्यामुळे जल पर्यटनाशी संबंधित कामे प्राधान्याने आणि तातडीने पूर्ण करावीत. आवश्यक त्या परवानग्या, तांत्रिक बाबी आणि विभागीय समन्वय वेळेत पूर्ण करून कामांना गती द्यावी, अशा सूचनाही पालकमंत्री देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
पर्यटन आराखड्यातील कामे केवळ पर्यटनस्थळांच्या विकासापुरती मर्यादित न ठेवता स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी आणि रोजगारनिर्मितीला चालना देणारी ठरावीत, यासाठी कामांचा दर्जा आणि वेळेचे काटेकोर पालन आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत संबंधित विभागांकडून सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती, प्रगती, अडचणी आणि आगामी कालावधीतील नियोजन याबाबत माहिती घेण्यात आली. निर्धारित कालमर्यादेत कामे पूर्ण करून पर्यटन विकासाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याला अधिक सक्षम पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यावर भर देण्यात आला.
Comments
Post a Comment