अमरावती-वर्धा जिल्ह्यात दहशत माजवणारी नरभक्षक वाघीण अखेर जेरबंद; वन विभागाच्या थरारक कारवाईने नागरिकांचा सुटकेचा श्वास

अमरावती-वर्धा जिल्ह्यात दहशत माजवणारी नरभक्षक वाघीण अखेर जेरबंद; वन विभागाच्या थरारक कारवाईने नागरिकांचा सुटकेचा श्वास

अमरावती प्रतिनिधी : 

गेल्या वीस दिवसांपासून अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांतील ग्रामीण भागात प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या आणि चार निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्या उपद्रवी वाघिणीला अखेर वन विभागाच्या विशेष पथकाने यशस्वीरीत्या जेरबंद केले. चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा शिवारात ट्रँक्विलायझर गनच्या साहाय्याने गुंगीचे औषध देऊन तिला जेरबंद करण्यात आले. या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे, अशी माहिती अमरावतीचे उपवनसंरक्षक (प्रादेशिक) अर्जुना के. आर. यांनी दिली.

चार निष्पाप नागरिकांचा घेतला होता बळी या वाघिणीने वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून आपला प्रवास सुरू केला होता. तेथून अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी आणि चांदूर बाजार या तालुक्यांत धुमाकूळ घालत तिने पाळीव प्राण्यांवर हल्ले केले तसेच २० दिवसांच्या कालावधीत चार जणांना ठार केले. या हल्ल्यांत खालील नागरिकांना प्राण गमवावे लागले:

  • रामभाऊ भोयर (वय ७४) – नरसिंगपूर, जि. वर्धा (१७ ऑगस्ट)
  • चरणदास ईखे (वय ५५) – भांबोरा, ता. मोर्शी (२७ ऑगस्ट)
  • उर्मिला बाजीराव इवने (वय १८) – सोनोरी, ता. चांदूर बाजार (६ सप्टेंबर)
  • दिनेश आवारे (वय ४५) – शिरजगाव कसबा, ता. चांदूर बाजार (७ सप्टेंबर)

सोनोरी येथील १८ वर्षीय तरुणीच्या मृत्यूनंतर अवघ्या २४ तासांच्या आत शिरजगाव कसबा येथे दिनेश आवारे यांच्यावर हल्ला झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि जनक्षोभ उसळला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने चोख बंदोबस्त तैनात केला होता.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व व्यापक मोहीम वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने युद्धपातळीवर शोधमोहीम हाती घेतली. तिचा माग काढण्यासाठी २४ तास शीघ्र कृती दल (RRT) तैनात करण्यात आले होते. सोबतच कॅमेरा ट्रॅप, थर्मल ड्रोन कॅमेरे आणि रात्रीच्या गस्तीचा आधार घेण्यात आला. गावागावांत दवंडी देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात होते. अखेर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (NTCA) नियमावलीनुसार अचूक निशाणा साधून तिला सुरक्षितपणे बेशुद्ध करण्यात आले.

तातडीची आर्थिक मदत आणि संयुक्त प्रयत्न वाघिणीच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व मृतांच्या कुटुंबीयांना वन विभागाच्या वतीने तातडीची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली आहे.

ही संपूर्ण मोहीम मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर आणि मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत अमरावती, मेळघाट (प्रादेशिक) परतवाडा, अकोला, वर्धा वनविभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे कर्मचारी, पुण्याचे तज्ज्ञ पथक, जिल्हा प्रशासन, पोलीस दल, मानद वन्यजीव रक्षक आणि विविध स्वयंसेवी संस्थांनी मोलाची भूमिका बजावली.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl