ग्राहकांच्या हक्कांसाठी संघटित होण्याचे आवाहन; सेलूत ग्राहक पंचायतचा स्थापना दिन उत्साहात ग्राहक जागृतीतून शोषणमुक्त समाजनिर्मितीचा संकल्प; कार्यकर्त्यांचा स्नेह-परिचय मेळावा उत्साहात
ग्राहकांच्या हक्कांसाठी संघटित होण्याचे आवाहन; सेलूत ग्राहक पंचायतचा स्थापना दिन उत्साहात
ग्राहक जागृतीतून शोषणमुक्त समाजनिर्मितीचा संकल्प; कार्यकर्त्यांचा स्नेह-परिचय मेळावा उत्साहात
उत्तम लोखंडे
सेलू | प्रतिनिधी :
ग्राहकांचे हक्क, त्यांच्या समस्या आणि बाजारपेठेतील होणारे शोषण याविरोधात जनजागृती करण्यासाठी ग्राहक पंचायतचे कार्य अधिक व्यापक करण्याची गरज आहे. ग्राहकांनी आपल्या हक्कांबाबत सजग राहून संघटितपणे अन्यायाविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे देवगिरी प्रांताध्यक्ष डॉ. विलास मोरे यांनी केले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचा स्थापना दिवस तसेच सेलू तालुक्यातील कार्यकर्त्यांचा स्नेह-परिचय मेळावा रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी गेना कॉम्प्लेक्स, पहिला मजला, सेलू येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते, ग्राहक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद आणि ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी स्वतःचा परिचय करून दिला. तसेच ग्राहकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी आगामी काळात ग्राहक पंचायतच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. विलास मोरे यांनी ग्राहक पंचायतच्या स्थापनेमागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी यांनी समाजातील विविध प्रकारच्या शोषणाविरोधात ग्राहकांना सक्षम करण्यासाठी ‘ग्राहक संरक्षण कायदा’ हे प्रभावी शस्त्र दिले. दि. ६ सप्टेंबर १९७४ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीची स्थापना झाली. ‘ग्राहक एवं राजा’ आणि ‘शोषणमुक्त समाज’ हे ध्येय समोर ठेवून ग्राहक पंचायत सातत्याने कार्यरत आहे.
आजच्या काळात बाजारपेठेचे स्वरूप झपाट्याने बदलत असून ग्राहकांसमोरही अनेक नवीन आव्हाने निर्माण झाली आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांनी केवळ वस्तू किंवा सेवा खरेदी करणारा घटक न राहता आपल्या हक्कांची जाणीव असलेला जागरूक नागरिक म्हणून भूमिका बजावणे आवश्यक आहे. ग्राहकांची फसवणूक, निकृष्ट वस्तू, चुकीची माहिती, सेवा देताना होणारी टाळाटाळ तसेच विविध प्रकारच्या ग्राहक तक्रारींबाबत जनजागृती करण्यासाठी संघटनेचे कार्य गावपातळीपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ग्राहकांचे हक्क आणि कायदेशीर संरक्षण याबाबत जनजागृती निर्माण करण्यासोबतच समाजात प्रामाणिक व्यवहार, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची भावना निर्माण करण्यासाठी ग्राहक पंचायतची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे उपस्थितांनी सांगितले. सेलू तालुक्यातील विविध भागांत ग्राहक जागृतीचे उपक्रम राबविण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास रवी मुळावेकर, माधव काकडे, पूनमचंद खोना, गौतम सूर्यवंशी, के. जी. कुलकर्णी, सुनील गायकवाड, नागोराव देशमुख, ॲड. भूषण गेना यांच्यासह ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सतीश जाधव यांनी केले. सचिव गंगाधर कान्हेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर रवी कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या मेळाव्यामुळे सेलू तालुक्यात ग्राहक पंचायतच्या कार्याला नव्या उमेदीने सुरुवात करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
Comments
Post a Comment