नूतन महाविद्यालयात श्रीरामजी भांगडिया यांच्या जीवनचरित्रावर विशेष व्याख्यान
नूतन महाविद्यालयात श्रीरामजी भांगडिया यांच्या जीवनचरित्रावर विशेष व्याख्यान
उत्तम लोखंडे
सेलू प्रतिनिधी :
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन, विद्यापीठ वर्धापन दिन आणि श्रीरामजी भांगडिया यांच्या शतकोत्तर रजत जयंती महोत्सवानिमित्त नूतन महाविद्यालय, सेलू येथे ‘श्रीरामजी भांगडिया यांचे जीवनचरित्र’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्तम राठोड होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. आर. एम. खाडप, कनिष्ठ महाविद्यालयाचे (HSVC) समन्वयक प्रा. ए. टी. मदने उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य तथा प्रशासकीय अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. शरद कुलकर्णी यांनी आपल्या व्याख्यानातून श्रीरामजी भांगडिया यांच्या सामाजिक, शैक्षणिक, कृषी, राजकीय तसेच स्वातंत्र्यलढ्यातील कार्याच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. तांत्रिक शिक्षण, शेतीतील प्रयोग, सुधारित बियाण्यांचा वापर, रेशीम शेती आणि कापूस उत्पादनवाढीसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली.
हादगाव, रवळगाव, मोरेगाव आदी गावांना भेटी देऊन श्रीरामजी भांगडिया यांनी शेतकरी व विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक जनजागृती घडवून आणली. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणाकडे वळले आणि अभियंते, डॉक्टर यांसह विविध क्षेत्रांतील व्यावसायिक घडले, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
स्त्री शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान
स्त्री शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनासाठी श्रीरामजी भांगडिया यांनी दिलेले योगदान अधोरेखित करताना डॉ. कुलकर्णी म्हणाले की, मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे, या विचारातून त्यांनी कन्या विद्यालयाची स्थापना केली. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, या भूमिकेतून त्यांनी शैक्षणिक संस्थांच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.
१९५० नंतर नगरपालिका स्वीकृत सदस्य ते नगराध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास उल्लेखनीय ठरला. सेलू शहराच्या विकासाला दिशा देत शहराला वेगळी ओळख मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. १९७०च्या दशकात गावोगावी जाऊन स्वच्छ व सुंदर गाव ही संकल्पना त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवली. हातात छत्री घेऊन गावोगावी फिरत त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.
नगरपालिकेच्या माध्यमातून बालवाड्यांची स्थापना, सर्वोदय नगर परिसरातील दलित बांधवांना अल्पदरात घरे उपलब्ध करून देणे तसेच सिमेंटचे पक्के रस्ते बांधणे अशा विविध विकासकामांची माहितीही डॉ. कुलकर्णी यांनी दिली.
हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभाग
श्रीरामजी भांगडिया हे निरपेक्ष वृत्तीने समाजकार्य करणारे, आजीवन अविवाहित राहून ब्रह्मचर्याचे पालन करणारे आणि प्रभावी संघटन कौशल्य असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी सामाजिक व राजकीय नेतृत्व घडविण्याचे कार्य केले. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेला राष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी नमूद केले.
हैदराबाद मुक्तिसंग्रामातील त्यांचा सहभाग हा त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा अध्याय असल्याचे सांगताना डॉ. कुलकर्णी यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांचा त्यांच्यावर असलेला प्रभाव तसेच स्वामी रामानंद तीर्थ यांच्या समवेत त्यांनी मुक्तिसंग्रामात घेतलेला सहभाग विशद केला. या लढ्यात त्यांना कारावासही भोगावा लागला. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘दलित मित्र’ पुरस्काराने गौरविल्याची माहितीही त्यांनी दिली.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. उत्तम राठोड यांनी श्रीरामजी भांगडिया यांच्या कार्याचा गौरव केला. विद्यापीठ वर्धापन दिन आणि श्रीरामजी भांगडिया यांच्या शतकोत्तर रजत जयंती महोत्सवानिमित्त आयोजित विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कीर्ती निराळवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. मुक्ता सरदेपांडे यांनी केले. व्याख्यानास महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment