शहीद तुकाराम ओंबळे स्मारकाचे काम १० महिन्यांपासून ठप्प!; २६ नोव्हेंबरपूर्वी काम सुरू न झाल्यास ‘आत्मकलेश आंदोलना’चा इशारा
शहीद तुकाराम ओंबळे स्मारकाचे काम १० महिन्यांपासून ठप्प!; २६ नोव्हेंबरपूर्वी काम सुरू न झाल्यास ‘आत्मकलेश आंदोलना’चा इशारा
मेढा प्रतिनिधी :
जावळी तालुक्यातील मौजे केडंबे येथे देशासाठी प्राण अर्पण करणारे शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाचे काम कार्यारंभ आदेश होऊन तब्बल दहा महिने उलटूनही सुरू झाले नसल्याने संताप व्यक्त होत आहे. स्मारकाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) उद्योग आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष मिथुन भानुदास तळवलकर यांनी तहसीलदार, मेढा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच २६ नोव्हेंबरपूर्वी स्मारकाचे भूमिपूजन अथवा प्रत्यक्ष काम सुरू न झाल्यास २६ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय, मेढा येथे ‘आत्मकलेश आंदोलन’ करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्याच्या केडंबे गावचे सुपुत्र असलेल्या शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मृती जपण्यासाठी शासनाकडून स्मारक उभारण्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. निवेदनानुसार, सार्वजनिक बांधकाम (पश्चिम) विभाग, सातारा यांच्याकडून दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. या कामासाठी ९ कोटी ६४ लाख १६ हजार ४८६ रुपये इतकी मंजूर निविदा रक्कम असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कार्यारंभ आदेशानुसार कंत्राटदाराने आदेश मिळाल्यानंतर सात दिवसांच्या आत काम सुरू करणे अपेक्षित असून, निर्धारित कालावधीत काम पूर्ण करण्याची अट असल्याचे तळवलकर यांनी निवेदनात म्हटले आहे. मात्र, कार्यारंभ आदेशाला सुमारे दहा महिने उलटून गेले असतानाही स्मारकाच्या कामाचे भूमिपूजनदेखील झाले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
स्मारकासारख्या महत्त्वाच्या आणि भावनिक विषयाशी संबंधित कामात एवढा विलंब का होत आहे, असा सवाल उपस्थित करत तळवलकर यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संबंधित कंत्राटदाराच्या कामकाजाची चौकशी करून शासनाच्या नियमांनुसार आवश्यक ती कारवाई करावी आणि स्मारकाचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
२६ नोव्हेंबरची मुदत; अन्यथा आंदोलन
शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून २६ नोव्हेंबरपूर्वी स्मारकाचे प्रत्यक्ष बांधकाम किंवा किमान भूमिपूजन सुरू झाले नाही, तर त्याच दिवशी मेढा तहसील कार्यालयासमोर ‘आत्मकलेश आंदोलन’ करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा तळवलकर यांनी दिला आहे.
या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून संबंधित विभाग व कंत्राटदाराकडून कामातील विलंबाबाबत माहिती घ्यावी, रखडलेल्या कामाला तातडीने गती द्यावी आणि स्मारक उभारणीचे काम निर्धारित पद्धतीने पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, ९ कोटी ६४ लाखांहून अधिक निधीच्या स्मारकाचे काम कार्यारंभ आदेशानंतरही सुरू का झाले नाही? काम रखडण्यामागे नेमकी कारणे कोणती? प्रशासन संबंधित कंत्राटदारावर काय कारवाई करणार? या प्रश्नांकडे आता जावळी तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनासोबत कार्यारंभ आदेशाची प्रत जोडण्यात आली असून, प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याची भूमिका तळवलकर यांनी घेतली आहे. त्यामुळे २६ नोव्हेंबरपूर्वी प्रशासनाकडून या स्मारकाच्या कामाबाबत कोणती पावले उचलली जातात, याकडे जावळीकरांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment