महाबळेश्वर पर्यटननगरीत प्रामाणिकपणाचा आदर्श; पर्यटकाची दीड लाखांची रोकड, मोबाईल व महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग केली परत श्री छत्रपती संभाजी महाराज वाहनतळावरील नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक
महाबळेश्वर पर्यटननगरीत प्रामाणिकपणाचा आदर्श; पर्यटकाची दीड लाखांची रोकड, मोबाईल व महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग केली परत
श्री छत्रपती संभाजी महाराज वाहनतळावरील नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक
महाबळेश्वर प्रतिनिधी:
पर्यटननगरी महाबळेश्वर येथे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्री छत्रपती संभाजी महाराज वाहनतळ येथे एका पर्यटकाची बॅग आढळून आली. या बॅगेमध्ये तब्बल १ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच महत्त्वाची कागदपत्रे होती. संबंधित नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी कोणताही मोह न ठेवता ही बॅग सुरक्षितपणे संबंधित पर्यटकाच्या स्वाधीन केली.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष कुमार हे फतेगंज, उत्तर प्रदेश येथील असून दिल्लीहून महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी आले होते. पर्यटनादरम्यान त्यांची मौल्यवान वस्तू असलेली बॅग श्री छत्रपती संभाजी महाराज वाहनतळ येथे राहून गेली होती. काही वेळानंतर ही बॅग नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली.
बॅगची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, मोबाईल आणि महत्त्वाची कागदपत्रे असल्याचे समोर आले. एवढी मोठी रक्कम आणि मौल्यवान वस्तू असतानाही कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणाची भूमिका घेत बॅग संबंधित पर्यटकापर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला. अखेर बॅग योग्य व्यक्तीच्या स्वाधीन करण्यात आली. आपली हरवलेली बॅग आणि त्यातील सर्व साहित्य सुरक्षितपणे परत मिळाल्याने संतोष कुमार यांना मोठा दिलासा मिळाला.
या वेळी प्रकाश वाडकर, अस्लम मानकर, टिकू वागदरे, नविलकर यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या या प्रामाणिकपणामुळे महाबळेश्वरच्या पर्यटननगरीच्या सकारात्मक प्रतिमेत आणखी भर पडली आहे.
पर्यटनासाठी देशाच्या विविध भागांतून नागरिक महाबळेश्वरला येत असतात. अशा वेळी पर्यटकांच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेणे आणि सापडलेल्या वस्तू योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचविणे ही सामाजिक जबाबदारीची भावना या घटनेतून प्रकर्षाने दिसून आली. दीड लाख रुपयांची रोकड, मोबाईल आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग प्रामाणिकपणे परत करून नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी माणुसकीचा आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श निर्माण केला आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्याधिकारी योगेश पाटील आणि नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी संबंधित नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. कर्मचाऱ्यांच्या या प्रामाणिक कृतीबद्दल समाधान व्यक्त करताना, त्यांच्या या कृतीमुळे नगरपरिषद प्रशासनाला आणि कर्मचाऱ्यांना सार्थ अभिमान असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
पर्यटकाची हरवलेली बॅग सुरक्षितपणे परत करण्याच्या या कृतीचे पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांकडूनही कौतुक होत आहे. महाबळेश्वरच्या निसर्गसौंदर्यासोबतच येथील माणुसकी, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकीची ओळखही या घटनेतून अधोरेखित झाली आहे.
Comments
Post a Comment