प्राणी क्लेश रोखण्यासाठी जिल्हास्तरावर ठोस नियोजन; तक्रारींच्या तातडीच्या निवारणावर भर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक; भटक्या श्वानांचे व्यवस्थापन, जनावरांची वाहतूक आणि कत्तलखान्यांबाबत समन्वित कार्यवाहीचे निर्देश


प्राणी क्लेश रोखण्यासाठी जिल्हास्तरावर ठोस नियोजन; तक्रारींच्या तातडीच्या निवारणावर भर

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक; भटक्या श्वानांचे व्यवस्थापन, जनावरांची वाहतूक आणि कत्तलखान्यांबाबत समन्वित कार्यवाहीचे निर्देश

पुणे प्रतिनिधी : 

प्राण्यांवरील क्रूरता आणि क्लेशाच्या घटना रोखण्यासाठी जिल्हास्तरावर प्रभावी व समन्वयित नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या बैठकीत प्राणी क्रूरतेच्या तक्रारींचे वेळेत आणि नियमानुसार निवारण करण्यासह प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीला पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजेशकुमार वासनिक, पशुसंवर्धन सहायक आयुक्त विष्णु गर्जे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

प्राणी कल्याणाच्या दृष्टीने पोलिस विभाग, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत तसेच शासकीय व निमशासकीय संस्थांनी परस्पर समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. प्राणी क्रूरता, गोवंश संरक्षण, कत्तलखाने तसेच जनावरांची वाहतूक यासंदर्भात प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर निश्चित कार्यपद्धतीनुसार (SOP) तातडीने कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला.

प्राण्यांशी संवेदनशीलतेने वागण्याचे आवाहन

प्राण्यांना मारहाण करणे, काट्यांनी टोचणे, आजारी किंवा जखमी प्राण्यांवर उपचार न करणे, त्यांना बंदिस्त अथवा अत्यंत मर्यादित जागेत ठेवणे, तसेच पुरेसे अन्न, पाणी आणि निवारा उपलब्ध करून न देणे या प्रकारांना प्रतिबंध करणे आवश्यक आहे. प्राण्यांशी मानवतेच्या आणि संवेदनशीलतेच्या दृष्टिकोनातून वागण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.

भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनासाठी कालबद्ध कार्यक्रम

भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या. भटक्या श्वानांसाठी आश्रय, निवारा आणि खाद्य देण्याच्या जागा निश्चित करणे, निर्बिजीकरण, वैद्यकीय उपचार आणि अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले.

१३ तक्रारींचे निवारण

प्राणी क्लेश प्रतिबंधक संस्थेअंतर्गत मागील वर्षापासून आतापर्यंत १३ तक्रारी प्राप्त झाल्या असून सर्व तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. भविष्यातही प्राणी क्रूरतेशी संबंधित तक्रारींकडे गांभीर्याने पाहून त्यांचे संवेदनशीलतेने आणि वेळेत निवारण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

चांगल्या कार्यपद्धतींची इतर तालुक्यांतही अंमलबजावणी

प्राणी क्रूरतेच्या घटना कमी करण्यासाठी यावर्षी स्पष्ट उद्दिष्ट निश्चित करून त्यानुसार व्यापक कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. सक्षम ग्रामपंचायती, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींनी राबविलेल्या प्रभावी उपक्रमांचा आणि चांगल्या कार्यपद्धतींचा अभ्यास करून त्यांचे मॉडेल इतर तालुक्यांमध्येही राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

कत्तलखान्यांचे नियमन, जनावरांची वाहतूक, गोवंश संरक्षण आणि प्राणी कल्याणाशी संबंधित विविध विभागांमध्ये समन्वय वाढवून नियोजनबद्ध कार्यवाही करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. केवळ तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्याऐवजी प्राणी क्रूरतेच्या घटना घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावी करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

जिल्ह्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधित विभागांनी प्राणी कल्याणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करून प्राण्यांवरील अत्याचार कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आला.

#पुणेजिल्हा #प्राणीक्रूरता #प्राणीसंवर्धन #प्राणीकल्याण #प्राणीसंरक्षण #जिल्हाप्रशासन #पुणे #भटकेश्वान #प्राणीहक्क #AnimalWelfare

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl