महाबळेश्वर–तापोळा मार्गावर बसचा ब्रेक फेल; मोठा अनर्थ टळला!चिखलीजवळ पाच प्रवासी जखमी; रमाबाई हिरवे यांना पुढील उपचारांसाठी वाईला हलवले — चालकाच्या प्रसंगावधानाचे कौतुक, एसटी बसच्या तांत्रिक तपासणीची मागणी
महाबळेश्वर–तापोळा मार्गावर बसचा ब्रेक फेल; मोठा अनर्थ टळला!
चिखलीजवळ पाच प्रवासी जखमी; रमाबाई हिरवे यांना पुढील उपचारांसाठी वाईला हलवले — चालकाच्या प्रसंगावधानाचे कौतुक, एसटी बसच्या तांत्रिक तपासणीची मागणी
तापोळा प्रतिनिधी :
महाबळेश्वर–तापोळा मार्गावरील चिखली गावाजवळ प्रवासी बसचा अचानक ब्रेक फेल झाल्याची घटना सोमवारी घडली. बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत असताना हा प्रकार घडल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेत पाच प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर तळदेव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वरहून तापोळ्याच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसचा चिखली परिसरात अचानक ब्रेक फेल झाला. डोंगराळ व वळणावळणाच्या रस्त्यावर हा प्रकार घडल्याने बसमधील प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. मात्र, चालकाने परिस्थितीवर नियंत्रण ठेवत प्रसंगावधानाने बस सुरक्षितपणे हाताळल्याने मोठा अनर्थ टळला.
या घटनेत पाच प्रवाशांना दुखापत झाली. जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने तळदेव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी रमाबाई बाळू हिरवे यांना अधिक तपासणीची आवश्यकता असल्याने महाबळेश्वर येथे नेल्यानंतर सीटी स्कॅनसाठी वाई येथे हलविण्यात आले.
रमाबाई हिरवे यांच्या उपचारासाठी जिल्हा परिषद सदस्य अजितदादा संकपाळ यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली तसेच उपचाराच्या काळात वारंवार फोनद्वारे मदत व संपर्क ठेवला. या मदतीबद्दल त्यांच्या कुटुंबीयांकडून आभार व्यक्त करण्यात आले.
स्थानिक नागरिकांची तत्पर मदत
घटना घडताच चिखली परिसरातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमधील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढणे, जखमींना प्राथमिक मदत करणे आणि त्यांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य केले. स्थानिकांच्या या तत्पर मदतीमुळे जखमींना वेळेत उपचार मिळण्यास मदत झाली.
‘जुन्या बसमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ नको’
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये एसटी बसच्या तांत्रिक स्थितीबाबत नाराजी व्यक्त होत आहे. काही नागरिकांनी तापोळा मार्गावर जुन्या अथवा वापरातून बाद करण्याच्या स्थितीतील बस चालवल्या जात असल्याचा आरोप केला असून, अशा बसची तातडीने तपासणी करण्याची मागणी केली आहे.
“महाबळेश्वर हे घाटमाथ्यावरील ठिकाण असून तापोळा मार्ग डोंगराळ, अरुंद आणि वळणावळणाचा आहे. अशा मार्गावर प्रवासी बसची तांत्रिक स्थिती उत्तम असणे अत्यावश्यक आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचले,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त करण्यात आली.
नव्या बस ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी वापरण्याची मागणी
काही महिन्यांपूर्वी महाबळेश्वर आगाराला दहा नवीन एसटी बस उपलब्ध झाल्याचा उल्लेख करत ग्रामीण भागातील नागरिकांनी या बसचा लाभ स्थानिक प्रवाशांना मिळावा, अशी मागणी केली आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातून विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार दररोज महाबळेश्वरकडे ये-जा करतात. त्यांच्या दैनंदिन प्रवासासाठी सुरक्षित आणि चांगल्या स्थितीतील बस उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी जुन्या बसवर अवलंबून राहावे लागत असेल, तर नव्याने उपलब्ध झालेल्या बसचा वापर ग्रामीण मार्गांवरही पुरेशा प्रमाणात करण्यात यावा, अशी मागणी पुढे येत आहे.
घाटमार्गावर नियमित तांत्रिक तपासणीची गरज
महाबळेश्वर–तापोळा मार्ग हा पर्यटन आणि ग्रामीण वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असला तरी हा अत्यंत डोंगराळ आणि धोकादायक वळणांचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या प्रत्येक प्रवासी बसची ब्रेक व्यवस्था, टायर, स्टेअरिंग, इंजिन आणि इतर महत्त्वाच्या यंत्रणांची नियमित व काटेकोर तपासणी होणे आवश्यक आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ प्रशासनाने चिखली येथील घटनेची चौकशी करून बसची तांत्रिक स्थिती तपासावी, तसेच महाबळेश्वर आगारातील सर्व बसची विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
चालकाच्या प्रसंगावधानाचे कौतुक; प्रशासनाकडून सुरक्षिततेची अपेक्षा
ब्रेक निकामी झाल्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात ठेवणाऱ्या चालकाच्या प्रसंगावधानाचे प्रवासी व नागरिकांकडून कौतुक होत आहे. मात्र, चालकांच्या कौशल्यावरच प्रवाशांची सुरक्षितता अवलंबून राहू नये, तर त्यासाठी बसची तांत्रिक स्थितीही तितकीच सक्षम असणे आवश्यक आहे.
या घटनेत मोठी जीवितहानी टळली असली तरी भविष्यात अशा प्रकारची घटना गंभीर स्वरूप धारण करू नये, यासाठी एसटी महामंडळ प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment