साताऱ्यात ‘आदर्श शाळा’ आणि ‘स्मार्ट आरोग्य केंद्रां’च्या कामांना गती; डिसेंबरअखेर कामे पूर्ण करण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश शिक्षण व सार्वजनिक आरोग्यात सातारा जिल्हा राज्यात अव्वल करण्याचा निर्धार; सौरऊर्जेवर शाळा-आरोग्य केंद्रे कार्यरत करण्यावर भर


साताऱ्यात ‘आदर्श शाळा’ आणि ‘स्मार्ट आरोग्य केंद्रां’च्या कामांना गती; डिसेंबरअखेर कामे पूर्ण करण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

शिक्षण व सार्वजनिक आरोग्यात सातारा जिल्हा राज्यात अव्वल करण्याचा निर्धार; सौरऊर्जेवर शाळा-आरोग्य केंद्रे कार्यरत करण्यावर भर

सातारा प्रतिनिधी :

प्राथमिक शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य या दोन्ही महत्त्वाच्या क्षेत्रांत सातारा जिल्ह्याला राज्यात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी ‘माझी शाळा, आदर्श शाळा’ आणि ‘स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र’ या योजनांतर्गत सुरू असलेल्या विकासकामांना गती द्यावी. ही सर्व कामे डिसेंबरअखेर पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे ‘माझी शाळा, आदर्श शाळा’ आणि ‘स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र’ उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या कामांचा पालकमंत्री देसाई यांनी आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

शाळा आणि आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणावर भर

जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना पालकमंत्री देसाई यांनी यावेळी केल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या सुविधा मिळाव्यात आणि नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी या दोन्ही योजनांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आदर्श शाळा सौरऊर्जेवर कार्यरत करण्याचा प्रयत्न करावा, अशी महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी केली. त्यामुळे भविष्यात वीजपुरवठ्यातील अडचणी कमी होण्यास मदत होईल, तसेच पर्यावरणपूरक ऊर्जा वापराला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

पूर्ण झालेल्या आदर्श शाळांची पाहणी करण्याचे निर्देश

ज्या शाळांचे आदर्श शाळा योजनेंतर्गत काम पूर्ण झाले आहे, त्या शाळांना संबंधित गट शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील स्मार्ट शाळांना पंधरा दिवसांत भेट देऊन पाहणी करावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. पूर्ण झालेल्या कामांची गुणवत्ता, उपलब्ध सुविधा आणि त्यांचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष होणारा उपयोग याचा आढावा घेण्यावर त्यांनी भर दिला.

तसेच सातारा जिल्ह्यातील प्रत्येक नगर परिषद हद्दीत दरवर्षी किमान एक शाळा ‘आदर्श शाळा’ म्हणून जिल्हा वार्षिक योजनेतून विकसित करण्यात यावी, अशी सूचनाही देसाई यांनी केली.

दर पंधरा दिवसांनी कामांचा आढावा

‘माझी शाळा, आदर्श शाळा’ आणि ‘स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र’ या योजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध असून, निधीअभावी कामे रखडता कामा नयेत, असे पालकमंत्री देसाई यांनी स्पष्ट केले. कामांना गती देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दर पंधरा दिवसांनी आढावा बैठक घेऊन प्रगती तपासावी, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्याला विशेष महत्त्व दिले आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील दोन्ही योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामीण भागातील शाळा व आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांमध्ये गुणात्मक सुधारणा करण्याची गरज असल्याचे देसाई यांनी नमूद केले.

अधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवून कामे पूर्ण करा

या योजनांशी संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून कामे निश्चित केलेल्या मुदतीत पूर्ण करावीत. केवळ कामे मंजूर करून न थांबता त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, गुणवत्ता आणि वेळेत पूर्णत्व याकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

डिसेंबरअखेरपर्यंत कामे पूर्ण करून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याला राज्यात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहनही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl