गरीब कलाकारांच्या कलागुणांना मिळणार नवे व्यासपीठ; ‘बँजो कलाकार बिट्स’ मंडळाला संजय मोरे व अजित सपकाळ यांचे योगदान
गरीब कलाकारांच्या कलागुणांना मिळणार नवे व्यासपीठ; ‘बँजो कलाकार बिट्स’ मंडळाला संजय मोरे व अजित सपकाळ यांचे योगदान
✍️संतोष मालुसरे,
तापोळा प्रतिनिधी :
महाबळेश्वर शहरातील होतकरू व गोरगरीब मुलांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने ‘बँजो कलाकार बिट्स, महाबळेश्वर’ या मंडळाला सामाजिक योगदान देण्यात आले.
बँजो कलाकार नयन वन्ने आणि ऋतिक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या या मंडळामध्ये आर्थिकदृष्ट्या गरजू तसेच कला क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मुलांचा सहभाग आहे. या मुलांना आपली कला सादर करण्यासाठी आवश्यक संधी आणि व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी विविध स्तरातून सहकार्य मिळणे गरजेचे आहे.
याच सामाजिक भावनेतून महाबळेश्वर तालुक्यातील वाडा-कुंभरोशी गणाचे उपसभापती माननीय संजयभाऊ मोरे साहेब तसेच सातारा जिल्हा परिषद सदस्य श्री. अजित सपकाळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बँजो कलाकार बिट्स, महाबळेश्वर’ या मंडळाला योगदान देण्यात आले.
या योगदानामुळे मंडळातील कलाकारांना आपल्या कलेचा विकास करण्यासाठी तसेच विविध सार्वजनिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी मोठी मदत होणार आहे. विशेषतः आर्थिक परिस्थितीमुळे अनेकदा संधीपासून दूर राहणाऱ्या मुलांना या माध्यमातून प्रोत्साहन मिळणार आहे.
कला ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून अनेकांच्या आयुष्याला दिशा देणारे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील होतकरू कलाकारांना प्रोत्साहन देऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. संजय मोरे आणि अजित सपकाळ यांनी केलेल्या या योगदानामुळे इतर सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि दानशूर व्यक्तींनाही अशा कलाकारांना मदतीचा हात देण्यासाठी प्रेरणा मिळेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
यावेळी ‘बँजो कलाकार बिट्स, महाबळेश्वर’ मंडळाच्या वतीने संजयभाऊ मोरे आणि अजित सपकाळ यांचे आभार मानण्यात आले. गोरगरीब व होतकरू मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि महाबळेश्वरच्या सांस्कृतिक क्षेत्रात या कलाकारांना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता यावी, यासाठी मंडळ भविष्यातही प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगण्यात आले.
Comments
Post a Comment