महसूल दिनानिमित्त सेलूचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांचा 'उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी' म्हणून विभागीय गौरव
महसूल दिनानिमित्त सेलूचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांचा 'उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी' म्हणून विभागीय गौरव
✍️उत्तम लोखंडे
परभणी प्रतिनिधी |
महसूल दिनाच्या औचित्याने महसूल प्रशासनातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत विभागीय स्तरावर सेलू उपविभागाचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांना 'उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा गौरव परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांच्या कार्यक्षम, लोकाभिमुख आणि परिणामकारक प्रशासनामुळे हा सन्मान मिळाल्याने महसूल विभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शैलेश लाहोटी यांनी आपल्या कार्यकाळात महसूल प्रशासन अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम प्रभावीपणे राबविले. जालना–नांदेड द्रुतगती महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून शेकडो प्रकरणांचा यशस्वी निपटारा, अवैध रेती वाहतुकीवर कठोर कारवाई, कालबाह्य स्टोन क्रशरविरुद्ध प्रभावी कारवाई, वेठबिगार मजुरांची सुटका, घरकुल लाभार्थ्यांसाठी वाळू उपलब्ध करून देणे, तसेच हद्दपार प्रकरणांवर वेळेत निर्णय घेणे या कामांची विशेष दखल घेण्यात आली.
याशिवाय, निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण आणि पारदर्शकपणे पार पाडणे, विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (SIR) मोहिमेत उल्लेखनीय प्रगती, ई-चावडी प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी, महसूल शिबिरांचे यशस्वी आयोजन, हजारो जात व नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्रांचे वेळेत वितरण, मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मंजुरी, तसेच 'आपले सरकार' पोर्टलवरील अर्जांचा वेळेत निपटारा अशा अनेक लोकहिताच्या कामांमुळे त्यांची प्रशासकीय कार्यक्षमता अधोरेखित झाली.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर शैलेश लाहोटी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "महसूल दिनानिमित्त विभागीय स्तरावर उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून झालेला हा सन्मान केवळ माझा नसून संपूर्ण महसूल यंत्रणेचा आहे. या यशामागे सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल कर्मचारी, पोलिस पाटील, कोतवाल, शिपाई तसेच सर्व सहकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे समर्पण, मेहनत आणि उत्कृष्ट टीमवर्क आहे. या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. भविष्यातही नागरिकांना अधिक पारदर्शक, परिणामकारक आणि लोकाभिमुख महसूल सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू."
शैलेश लाहोटी यांच्या या यशाबद्दल महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी, विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
Comments
Post a Comment