देवसरेत मध्यरात्री बिबट्याचा वावर; म्हशींच्या गोठ्याजवळ अचानक दर्शनाने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
देवसरेत मध्यरात्री बिबट्याचा वावर; म्हशींच्या गोठ्याजवळ अचानक दर्शनाने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
✍️संतोष मालुसरे,
तापोळा प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील देवसरे गावात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याचा वावर आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास गावातील रहिवासी रमेश जाधव यांच्या घराजवळील म्हशींच्या गोठ्याजवळ बिबट्या आल्याचे निदर्शनास आले.
रमेश जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री गोठ्यातील म्हशी अचानक जोरजोरात आवाज करत अस्वस्थ झाल्या. त्यामुळे संशय आल्याने त्यांनी बॅटरी घेऊन घराबाहेर येत गोठ्याजवळ पाहणी केली. त्यावेळी गोठ्याच्या परिसरातून एक बिबट्या पळत जाताना त्यांना स्पष्टपणे दिसला. बॅटरीच्या प्रकाशात बिबट्या दिसल्याने जाधव यांनी तातडीने घरात परत येत कुटुंबीयांना सावध केले.
यानंतर सकाळी बिबट्या ज्या दिशेने गेला त्या परिसरात ग्रामस्थांनी पाहणी केली. तेथे बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. बिबट्या फार दूर गेला नसावा आणि गावाच्या आसपासच्या झाडी अथवा जाळीतच लपून बसला असण्याची शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
शेतात जाण्यासह जनावरे रानात नेण्याची भीती
देवसरे परिसरात सध्या भात लागणीचे काम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी सकाळपासून शेतात कामासाठी जात आहेत. मात्र, बिबट्याच्या वावरामुळे शेतात जाण्यासही ग्रामस्थांना भीती वाटत आहे. तसेच जनावरे रानात चरण्यासाठी घेऊन जाणेही धोकादायक ठरेल, अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
गावामध्ये सध्या प्रामुख्याने वयोवृद्ध नागरिक असल्याने रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर आढळल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बिबट्या पुन्हा मानवी वस्तीकडे येण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
वनविभागाने तातडीने पाहणी करण्याची मागणी
बिबट्याच्या वावराची माहिती संबंधित वनविभागाला देऊन परिसराची तातडीने पाहणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. बिबट्याचा नेमका वावर कोणत्या भागात आहे, त्याचा माग काढण्यासाठी पावलांचे ठसे तपासावेत तसेच आवश्यक असल्यास कॅमेरा ट्रॅप लावून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
दरम्यान, बिबट्याचा वावर लक्षात घेता नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, एकट्याने शेतात किंवा जंगलालगतच्या भागात जाऊ नये आणि जनावरे घेऊन जाताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
देवसरे परिसरात बिबट्याचा वावर स्पष्ट झाल्याने वनविभाग आता काय उपाययोजना करतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment