संस्कार, श्रमप्रतिष्ठा आणि देशभक्तीचा संदेश देत चंचळीतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात
संस्कार, श्रमप्रतिष्ठा आणि देशभक्तीचा संदेश देत चंचळीतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात
माजी सैनिक निलेश कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण; गुणवंत विद्यार्थिनीचा गौरव, शाळेला ७५ हजारांची देणगी
चंचळी प्रतिनिधी :
ज्ञानाला सुसंस्कारांची जोड देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या श्री चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटी, रहिमतपूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल, चंचळी, ता. कोरेगाव येथे भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. देशभक्ती, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत विविध उपक्रमांनी कार्यक्रमाची रंगत वाढली.
स्वातंत्र्य दिनानिमित्त चंचळी येथील माजी सैनिक श्री. निलेश धनाजी कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे सहसचिव तथा शालेय समितीचे अध्यक्ष श्री. वामनराव जाधव, संस्थेचे कोषाध्यक्ष व शालेय समिती सदस्य श्री. शिवाजी शिंदे आबा, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. गुलाबराव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. आण्णासाहेब शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व आणि विद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीची माहिती दिली. उपस्थित मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने यावेळी सन्मान करण्यात आला.
गुणवंत विद्यार्थिनीचा गौरव
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनी कु. साक्षी संजय गवंडी हिचा स्निग्धा सोशल फाउंडेशन, पेठकिन्हई यांच्या वतीने सन्मानचिन्ह व ६५१ रुपये रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. तसेच सुभद्रा हनमंत कदम यांनी नवभारत साक्षरता परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक व सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. बाजीराव कारंडे यांनी विद्यालयासाठी ७५ हजार रुपयांची देणगी मिळवून दिल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे सेवक श्री. संजय माने यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केल्याबद्दल तसेच भविष्यात विद्यालयासाठी भरीव आर्थिक योगदान देण्याचे आश्वासन दिल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी व्यक्त केले मनोगत
कार्यक्रमात इयत्ता आठवीतील विद्यार्थी राजवीर केंजळे आणि यश कदम यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. गुलाबराव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. वामनराव जाधव यांनी स्वातंत्र्य संग्रामात देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांचे स्मरण केले. विद्यार्थ्यांनी संस्कार, श्रमप्रतिष्ठा आणि देशप्रेमाची मूल्ये जपावीत. तसेच आई-वडिलांनी केलेल्या त्यागाची जाणीव ठेवून त्यांच्या ऋणात कायम राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. निलेश कदम यांनी विद्यालयाच्या विकासासाठी भविष्यात भरीव आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले.
‘हर घर तिरंगा’ अभियानालाही उत्स्फूर्त प्रतिसाद
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘हर घर तिरंगा अभियान २०२६’ अंतर्गत विद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात आले. १३ ऑगस्ट २०२६ रोजी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सौ. अर्चना अतुल कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच १४ ऑगस्ट २०२६ रोजी न्यू इंग्लिश स्कूल, चंचळीच्या महिला तक्रार निवारण समितीच्या सचिव सौ. निशा तुषार कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या दोन्ही प्रसंगी विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. बाजीराव कारंडे यांच्यासह विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. बाजीराव कारंडे यांनी उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. देशभक्ती, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत स्वातंत्र्य दिनाचा हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
Comments
Post a Comment