लाखोंच्या दागिन्यांपेक्षा ‘विश्वास’ जपला! जिल्हा बँकेच्या सेवकांचा प्रामाणिकपणाचा आदर्श लॉकरवर विसरलेले तीन तोळे सोन्याचे दागिने व अर्धा किलो चांदीच्या वस्तू केले सुरक्षित परत; कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक


लाखोंच्या दागिन्यांपेक्षा ‘विश्वास’ जपला! जिल्हा बँकेच्या सेवकांचा प्रामाणिकपणाचा आदर्श

लॉकरवर विसरलेले तीन तोळे सोन्याचे दागिने व अर्धा किलो चांदीच्या वस्तू केले सुरक्षित परत; कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

सातारा प्रतिनिधी : 

“पैशांपेक्षा विश्वासाची किंमत मोठी असते आणि तो विश्वास जपणे हीच खरी बँकिंग सेवा आहे,” याचा प्रत्यय सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हा परिषद शाखेतील कर्मचाऱ्यांनी आपल्या कृतीतून दिला. लॉकरवर विसरलेली सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने आणि अर्धा किलो चांदीच्या वस्तू कोणतीही अपेक्षा न ठेवता संबंधित खातेदाराकडे सुरक्षितपणे परत करून कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हतेचा आदर्श निर्माण केला.

जिल्हा परिषद शाखेत कार्यरत सौ. सुजाता महेंद्र तुपे या लॉकरचा कप्पा उघडण्यासाठी शाखेत आल्या होत्या. काम आटोपल्यानंतर घाईगडबडीत त्या लॉकरवर ठेवलेली दागिन्यांची पिशवी तेथेच विसरून गेल्या. दरम्यान, दुपारी शाखेचे सेवक श्री. अनिल पवार लॉकरजवळ गेले असता त्यांना तेथे एक पिशवी आढळून आली.

अनिल पवार यांनी कोणताही विलंब न करता पिशवी सुरक्षित ठिकाणी ठेवून शाखाप्रमुख श्री. विवेक मोरे आणि कॅशियर सौ. रुपाली लावंड यांना याबाबत माहिती दिली. पिशवीच्या बाहेरून त्यातील वस्तूंची माहिती स्पष्ट होत नसल्याने संपूर्ण पारदर्शकता राखण्यासाठी सीसीटीव्हीच्या निगराणीखाली पिशवी उघडण्यात आली. त्यातील कापडी पिशवीवरील नावावरून ती सौ. सुजाता तुपे यांची असल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर शाखाप्रमुख श्री. विवेक मोरे यांनी सौ. तुपे यांच्याशी संपर्क साधून त्यांना शाखेत बोलावून घेतले. श्री. अक्षय बोबडे, सौ. सुप्रिया देशमुख आणि कु. प्रज्ञा आगुंडे यांच्या उपस्थितीत पिशवीची पडताळणी करण्यात आली. यावेळी सौ. तुपे यांनी सांगितलेले सोन्याचे दागिने तसेच त्यांच्या पती व मुलांच्या चांदीच्या वस्तू पिशवीमध्ये जशाच्या तशा असल्याचे आढळून आले.

आपली लाखो रुपयांची मौल्यवान संपत्ती सुरक्षितपणे परत मिळाल्याने सौ. तुपे यांनी जिल्हा बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. या घटनेमुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांप्रती असलेला विश्वास आणखी दृढ झाला.

“विश्वास जपणारे कर्मचारी हीच जिल्हा बँकेची खरी ताकद”

या घटनेचे कौतुक करताना सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र सरकाळे यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे अभिनंदन केले. ग्राहकांचा पैसा आणि त्यांच्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवणे ही बँकेची जबाबदारी आहेच; मात्र एखाद्या ग्राहकाची विसरलेली मौल्यवान संपत्ती कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे परत करणे, ही कर्मचाऱ्यांच्या मूल्यनिष्ठ सेवेची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.

राजू भैय्या भोसले यांच्याकडून कौतुक

जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. राजू भैय्या भोसले यांनीही जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. लाखो रुपयांच्या मौल्यवान वस्तू कोणतीही अपेक्षा न ठेवता परत करणे ही अभिमानाची बाब असून, अशा प्रामाणिक कर्मचाऱ्यांमुळे समाजातील विश्वास आणि माणुसकीची भावना अधिक दृढ होते, असे त्यांनी नमूद केले.

जिल्हा परिषद सदस्य श्री. अजित साळुंखे यांनीही शाखेतील सेवकांच्या तत्पर, विनम्र आणि प्रामाणिक सेवेचे कौतुक केले. त्यांनी श्री. अनिल पवार यांच्यासह शाखेतील सर्व सेवकांचा सत्कार करून त्यांच्या कार्याला दाद दिली.

प्रामाणिकपणाची परंपरा कायम

जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाची ही पहिलीच घटना नसल्याचेही यावेळी समोर आले. सन २०२० मध्ये परळी शाखेत शाखाप्रमुख म्हणून कार्यरत असताना श्री. विवेक मोरे यांनी एटीएम कार्डच्या माध्यमातून एका आरोग्य सेवकाचा संपर्क शोधून त्याचे रोख रकमेसह हरवलेले पाकीट परत केले होते.

ग्राहकांशी जिव्हाळ्याचे नाते, तत्पर सेवा आणि प्रामाणिकपणाची मूल्ये जपत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा “विश्वास हीच खरी कमाई” हा संदेश आपल्या कृतीतून दिला आहे.

या प्रामाणिक कार्याबद्दल जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक श्री. राजीव गाढवे, श्री. राजेंद्र भिलारे तसेच अधिकारीवर्गाने जिल्हा परिषद शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. या घटनेचे जिल्हा परिषदेसह विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl