एकाच इमारतीतील दोन शाळांचा प्रश्न ऐरणीवर; एमईएस शाळेला पर्यायी जागा देण्याची पालकांची मागणी
एकाच इमारतीतील दोन शाळांचा प्रश्न ऐरणीवर; एमईएस शाळेला पर्यायी जागा देण्याची पालकांची मागणी
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचा पालकांचा आरोप; नगराध्यक्ष व शिक्षण सभापतींना निवेदन
महाबळेश्वर प्रतिनिधी : नगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक १ व २ आणि एमईएस शाळा एकाच इमारतीत सुरू असल्यामुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर तसेच दैनंदिन शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत असल्याचे सांगत एमईएस शाळेला पर्यायी जागी लवकरात लवकर स्थलांतरित करण्याची मागणी पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सुनिल शिंदे आणि शिक्षण सभापती रोहित ढेबे यांना निवेदन देण्यात आले.
नगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक १ व २ मधील पालक समितीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या निवेदनात विद्यार्थ्यांना पुरेशा वर्गखोल्या, खेळाची जागा, मूलभूत सुविधा तसेच शांत व सुरक्षित शैक्षणिक वातावरण मिळणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
एमईएस शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने उपलब्ध वर्गखोल्यांवर मोठा ताण येत आहे. परिणामी नगरपालिका प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक त्या वर्गखोल्या उपलब्ध करून देताना अडचणी निर्माण होत असल्याचा दावा पालकांनी केला आहे. तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्यामुळे होणारा गोंगाट प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या अध्ययनात व्यत्यय आणत असून त्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शाळेच्या आवारातील मोठा भाग एमईएस शाळेच्या वापरात असल्याने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खेळ, प्रार्थना, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी पुरेशी जागा मिळत नसल्याची बाबही पालकांनी निदर्शनास आणून दिली आहे. दोन्ही शाळांचे वेळापत्रक वेगवेगळे असल्यामुळे विद्यार्थ्यांची ये-जा, गर्दी व गोंधळ वाढत असून लहान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राथमिक शाळेतील विद्यार्थी वयाने लहान असल्याने मोठ्या विद्यार्थ्यांच्या गर्दीत त्यांना मानसिक ताण व असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी आणि अन्य मूलभूत सुविधांवर अतिरिक्त ताण येत असल्याने प्राथमिक विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याची तक्रार पालकांनी केली आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना शांत, सुरक्षित आणि बालस्नेही शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत हे वातावरण पूर्णपणे उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, उपस्थिती आणि सर्वांगीण विकासावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता पालकांनी व्यक्त केली आहे.
शाळेच्या परिसरात वाढणारी गर्दी भविष्यात आपत्कालीन परिस्थितीतही अडचणीची ठरू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा तसेच सुरक्षिततेचा गांभीर्याने विचार करून एमईएस शाळेसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देत तिचे शक्य तितक्या लवकर स्थलांतर करण्यात यावे, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या वेळी शाळा व्यवस्थापन समिती क्रमांक २ चे अध्यक्ष नवनाथ बाळकृष्ण डोईफोडे, शाळा व्यवस्थापन समिती क्रमांक १ चे अध्यक्ष निलेश मारुती सपकाळ, शाळा व्यवस्थापन समिती क्रमांक ५ च्या अध्यक्षा नम्रता अरुण भिलारे, सुनिल भाऊ ढेबे, मुक्ता अमित कोमटी, पल्लवी प्रवीण इंगवले, धनेश शिंदे, निलेश वाडकर, अरुण श्रीपती भिलारे, पालक मंगेश ढेबे तसेच अन्य पालक उपस्थित होते.
नगरपालिका प्रशासनाने या प्रश्नाकडे केवळ शाळेच्या जागेचा प्रश्न म्हणून न पाहता प्राथमिक विद्यार्थ्यांच्या शिक्षण, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासाशी निगडित बाब म्हणून तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment