फेरफार अपिलाच्या निकालासाठी ५० हजारांची लाच; फलटणमध्ये खाजगी एजंट एसीबीच्या जाळ्यातप्रांताधिकाऱ्यांच्या नावे लाचेची मागणी केल्याचा आरोप; गिरवी चौकात सापळा रचून विकास तोडकरला रंगेहाथ पकडले


फेरफार अपिलाच्या निकालासाठी ५० हजारांची लाच; फलटणमध्ये खाजगी एजंट एसीबीच्या जाळ्यात

प्रांताधिकाऱ्यांच्या नावे लाचेची मागणी केल्याचा आरोप; गिरवी चौकात सापळा रचून विकास तोडकरला रंगेहाथ पकडले

फलटण प्रतिनिधी :

जमीन फेरफार अपिलातील विलंबमाफीचा अर्ज मंजूर करून तक्रारदाराच्या बाजूने अनुकूल निकाल मिळवून देण्यासाठी फलटणच्या प्रांताधिकाऱ्यांच्या नावे ५० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या एका खाजगी एजंटला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. विकास शंकर तोडकर (वय ३६, रा. नांदल, ता. फलटण) असे ताब्यात घेण्यात आलेल्या खाजगी इसमाचे नाव आहे. ही कारवाई ३१ ऑगस्ट रोजी गिरवी चौकातील लॉ कॉलेजसमोर करण्यात आली.

तक्रारदार शेतकऱ्याच्या मौजे टाकळवाडे येथील वडिलोपार्जित शेतजमिनीबाबत हा प्रकार घडला. या जमिनीची एका सहहिस्सेदाराने परस्पर विक्री केल्याचे तक्रारदाराच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे संबंधित फेरफार रद्द करण्यासाठी त्यांनी फलटण प्रांत कार्यालयात विलंबमाफीसह अपील दाखल केले होते.

या प्रकरणाच्या पाठपुराव्यासाठी तक्रारदार प्रांत कार्यालयात गेले असता, त्यांची ओळख असलेल्या विकास तोडकर याने या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची तयारी दर्शविल्याचा आरोप आहे. प्रांताधिकारी श्रीमती आंबेकर यांच्याकडून फेरफार अपिलातील विलंबमाफीचा अर्ज मंजूर करून घेण्याबरोबरच तक्रारदाराच्या बाजूने निकाल मिळवून देण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. तसेच निकालानंतर स्वतःसाठी आणखी १० हजार रुपये देण्याची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने याबाबत सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करण्यासाठी एसीबीच्या पथकाने २५, २७ आणि ३१ ऑगस्ट रोजी गिरवी चौक परिसरात पंचांसमक्ष कारवाई केली. या पडताळणीदरम्यान विकास तोडकर याने प्रांताधिकाऱ्यांच्या नावे वैयक्तिक प्रभाव पाडून ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले.

त्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी गिरवी चौकातील लॉ कॉलेजसमोर सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे लाचेची ५० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना विकास तोडकर याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईनंतर फलटण शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सातारा एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक शैला कोरडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार नितीन गोगावले, निलेश राजपूत, गणेश ताटे, महिला पोलीस नाईक प्रियांका जाधव आणि अजित कर्णे यांच्या पथकाने सापळा कारवाई यशस्वी केली.

जमिनीच्या फेरफारासारख्या महत्त्वाच्या महसूल प्रकरणात अनुकूल निकाल मिळवून देण्याच्या नावाखाली पैशांची मागणी होत असल्याचे या कारवाईतून समोर आले असून, शासकीय कार्यालयातील कामांसाठी मध्यस्थ किंवा खाजगी व्यक्तींकडून लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl