"१०५ गावांचा आक्रोश आता रस्त्यावर; मूलभूत सुविधांसाठी जनआंदोलनाची हाक, ९ ऑगस्टला नवी मुंबईत निर्णायक बैठक"
"१०५ गावांचा आक्रोश आता रस्त्यावर; मूलभूत सुविधांसाठी जनआंदोलनाची हाक, ९ ऑगस्टला नवी मुंबईत निर्णायक बैठक"
महाबळेश्वर | प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुक्यातील १०५ गावांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या विविध मूलभूत समस्यांवर व्यापक जनआंदोलन उभारण्याच्या उद्देशाने १०५ गाव कृती समिती, मुंबई यांच्या वतीने रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता नवी मुंबईतील श्री गणोबा गणेश सभागृह, तीन टाकी जवळ, सेक्टर-१९, कोपरखैरणे येथे महत्त्वपूर्ण चर्चा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीत केवळ रस्त्यांचा प्रश्न नव्हे, तर ग्रामीण भागातील नागरिकांना रोज भेडसावणाऱ्या सर्वच मूलभूत समस्यांवर सखोल चर्चा करून पुढील जनआंदोलनाची दिशा आणि कृती आराखडा निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
बैठकीतील प्रमुख विषयांमध्ये आराम चौक ते कारवी आळा या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचा प्रश्न, महाबळेश्वर शहरातील वाढती वाहतूक कोंडी, टोल नाक्यावरील वसुली, भूमिपुत्रांवर होत असल्याचा अन्याय, तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा समावेश आहे.
याशिवाय एसटी बस सेवा, मोबाईल नेटवर्क व इंटरनेट सुविधा, वीजपुरवठा, आरोग्य सेवा, शासकीय कार्यालयांतील विलंब, शिक्षणाच्या अपुऱ्या सुविधा, पाणीटंचाई, दवाखान्यांमध्ये डॉक्टर व औषधांचा अभाव अशा अनेक प्रश्नांवरही चर्चा होणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी या समस्यांबाबत सूचना दिल्याने त्यांचाही बैठकीच्या अजेंड्यात समावेश करण्यात आल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
समितीच्या आवाहनानुसार, हे आंदोलन कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडे नागरिकांच्या न्याय्य मागण्या ठामपणे पोहोचविण्यासाठी आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे १०५ गावांतील जनतेमध्ये तीव्र नाराजी असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आता संघटित लढा उभारण्याची वेळ आल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
समितीचे कार्यकर्ते अशोक शेठ सकपाळ आणि निशांत बुवा सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीचे नियोजन करण्यात आले असून, त्यांनी प्रसिद्ध केलेल्या आवाहनात समाजातील सर्व घटकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
त्यांच्या मते, १०५ गावांतील समस्या दोन-चार व्यक्तींनी सोडविणे शक्य नसून त्यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, उद्योजक, संस्था चालक, गावपातळीवरील नेते आणि सर्वसामान्य नागरिक यांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. नागरिकांच्या मनातील असंतोष, संताप आणि आक्रोशाला संघटित स्वरूप देण्यासाठी हे व्यासपीठ उभारण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बैठकीसाठी विशेषतः गावागावातील नेतेमंडळी, समाजसेवक, कार्यकर्ते, युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला, व्यापारी, उद्योजक, विविध सामाजिक संस्था, मंडळे तसेच सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
समितीच्या म्हणण्यानुसार, पर्यटनाच्या नकाशावर महत्त्वाचे स्थान असलेल्या महाबळेश्वर परिसरातील अनेक गावांमध्ये आजही चांगले रस्ते, नियमित वाहतूक, दर्जेदार शिक्षण, विश्वासार्ह आरोग्य सेवा, अखंड वीजपुरवठा आणि इंटरनेटसारख्या मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना रोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, या प्रश्नांना आता संघटितपणे वाचा फोडण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
या बैठकीत जनआंदोलनाचे स्वरूप, पुढील टप्प्यातील कृती, संबंधित विभागांशी पाठपुरावा आणि आवश्यक असल्यास व्यापक लोकआंदोलन उभारण्याबाबत एकमताने निर्णय घेतला जाणार असल्याचे समितीने सांगितले आहे.
९ ऑगस्ट रोजी होणारी ही बैठक १०५ गावांतील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांवर एकत्रितपणे आवाज उठविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.
Comments
Post a Comment