११ महिन्यांच्या चिमुकलीसह २१ वर्षीय महिला बेपत्ता; सेलू पोलिसांकडून शोधमोहीम सुरूगुगळी धामनगाव येथील घटना; घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्याची पतीची तक्रार
११ महिन्यांच्या चिमुकलीसह २१ वर्षीय महिला बेपत्ता; सेलू पोलिसांकडून शोधमोहीम सुरू
गुगळी धामनगाव येथील घटना; घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्याची पतीची तक्रार
✍️उत्तम लोखंडे ,
परभणी/सेलू प्रतिनिधी
सेलू तालुक्यातील गुगळी धामनगाव येथून २१ वर्षीय महिला आपल्या अवघ्या ११ महिन्यांच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना १२ ऑगस्ट रोजी घडली. आरती विठ्ठल काळे असे बेपत्ता महिलेचे नाव असून, तिच्यासोबत ११ महिन्यांची मुलगी नंदिनीही बेपत्ता आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, सेलू पोलिसांनी दोघींचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरती विठ्ठल काळे (वय २१, व्यवसाय-घरकाम, रा. गुगळी धामनगाव, ता. सेलू) या १२ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास आपल्या ११ महिन्यांच्या मुलीला सोबत घेऊन घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेल्या. त्यावेळी त्यांचे पती विठ्ठल काळे आणि सासू शेतातील कामासाठी घराबाहेर गेले होते.
सायंकाळी विठ्ठल काळे घरी परतल्यानंतर घराला कडी लावलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आरती व मुलगी नंदिनी घरात नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने शेजारी, नातेवाईक तसेच परिचितांकडे चौकशी सुरू केली. परिसरातही शोध घेण्यात आला. मात्र, दोघींबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.
यानंतर आरती यांच्या माहेरच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती देण्यात आली. कुटुंबीय आणि नातेवाईकांनी विविध ठिकाणी शोध घेतला तसेच संभाव्य ठिकाणी चौकशी केली. मात्र, आरती आणि नंदिनी यांचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर महिलेचे पती विठ्ठल काळे यांनी सेलू पोलीस ठाण्यात खबर दिली.
आरती यांचे वर्णन
बेपत्ता आरती काळे यांचा रंग गोरा असून, उंची सुमारे पाच फूट आहे. त्यांची शरीरयष्टी मध्यम असून चेहरा लांबट, नाक सरळ, डोळे मध्यम आकाराचे व केस काळे आहेत. त्या बेपत्ता होताना चॉकलेटी रंगाची साडी व ब्लाउज परिधान करून होत्या. त्यांच्या पायात काळ्या रंगाची चप्पल होती. आरती यांना मराठी भाषा येत असून, त्या सहावीपर्यंत शिक्षित आहेत.
आरती यांच्यासोबत त्यांची ११ महिन्यांची मुलगी नंदिनी असल्याने पोलिसांकडून दोघींचा एकत्रितपणे शोध घेतला जात आहे. कुटुंबीयांकडूनही नातेवाईक, परिचित आणि संभाव्य ठिकाणी शोध सुरू आहे.
माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्काचे आवाहन
या प्रकरणी सेलू पोलिसांनी माहिती घेऊन बेपत्ता महिला आणि तिच्या मुलीचा शोध सुरू केला आहे. आरती काळे किंवा त्यांची मुलगी नंदिनी यांच्याबाबत कोणास काही माहिती मिळाल्यास अथवा त्या कुठे आढळून आल्यास तातडीने सेलू पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
११ महिन्यांच्या चिमुकलीसह आई बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली असून, दोघी सुखरूप मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment