उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तापोळा परिसराला भेट; प्रस्तावित तापोळा पुलाची पाहणी, ग्रामीण आरोग्य सेवेचे कौतुक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तापोळा परिसराला भेट; प्रस्तावित तापोळा पुलाची पाहणी, ग्रामीण आरोग्य सेवेचे कौतुक
✍️संतोष मालुसरे ,
तापोळा | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी महाबळेश्वर तालुक्यातील दरेगाव येथे भेट देऊन कोयना, सोळशी आणि कांदाटी खोऱ्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी तापोळा परिसराला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या प्रस्तावित तापोळा पुलाच्या कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. या पुलामुळे परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाला मोठी चालना मिळणार असून पर्यटनालाही गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, तापोळा येथे सदिच्छा भेट देत आरोग्य केंद्रातील विविध विभागांची पाहणी केली. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा, विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी, उपलब्ध सुविधा तसेच ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेची माहिती त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.
प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार, तत्पर आणि प्रभावी आरोग्य सेवा दिली जात असल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक करत, आरोग्य केंद्रात आवश्यक असलेली वैद्यकीय यंत्रसामग्री व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनामार्फत सकारात्मक सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे, ग्रामविकास विभागाचे विभुते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
तसेच जिल्हा परिषद सदस्य अजित सकपाळ, महाबळेश्वर पंचायत समितीचे उपसभापती संजय मोरे, शिवसागर बोट क्लबचे चेअरमन आनंद धनावडे, युवा सेना जिल्हाप्रमुख विशाल सकपाळ, तालुकाप्रमुख गणेश उतेकर, सचिन कदम, राम सकपाळ, हरेश जाधव तसेच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे तापोळा परिसरातील प्रस्तावित विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. विशेषतः तापोळा पुलाच्या कामाबाबत सकारात्मक संकेत मिळाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेटीद्वारे ग्रामीण आरोग्य सेवेला शासनाचे प्राधान्य असून, दुर्गम भागातील नागरिकांना अधिक सक्षम व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा स्पष्ट संदेश या दौऱ्यातून मिळाला.
Comments
Post a Comment