पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सेलूत वृक्षारोपणाचा संकल्पश्री संत निरंकारी मंडळाच्या पुढाकाराने शाहू नगर येथे वृक्षारोपण; हरित व स्वच्छ परिसर निर्मितीचा निर्धार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सेलूत वृक्षारोपणाचा संकल्प
श्री संत निरंकारी मंडळाच्या पुढाकाराने शाहू नगर येथे वृक्षारोपण; हरित व स्वच्छ परिसर निर्मितीचा निर्धार
उत्तम लोखंडे
परभणी/सेलू प्रतिनिधी :
सेलू शहरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत श्री संत निरंकारी मंडळ, सेलू यांच्या वतीने रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता श्री शाहू नगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाची गरज अधोरेखित करत या उपक्रमातून परिसर अधिक हिरवागार, स्वच्छ व पर्यावरणपूरक करण्याचा संकल्प करण्यात आला.
वाढते शहरीकरण, प्रदूषण आणि बदलते हवामान यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून श्री संत निरंकारी मंडळाच्या वतीने वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी विविध प्रकारची रोपे लावण्यात आली. केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या रोपांचे संगोपन व संवर्धन करण्याचे आवाहनही उपस्थितांना करण्यात आले.
या उपक्रमामुळे शाहू नगर परिसरात पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश पोहोचला. नागरिकांनीही अशा सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपल्या परिसरात जास्तीत जास्त वृक्षलागवड करावी, तसेच लावलेल्या झाडांची नियमित काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमास उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, सौ. लक्ष्मीभाबी मेहता, डॉ. अनुराग जोगदंड, नगरसेवक दीपक कोल्हाळ, बंडू देवधर, डॉ. आशिष मेहता, श्री संत निरंकारी मंडळाचे मुखी अशोक महाराज राऊत, रवी लांडगे, सचिन आंगणे आदी उपस्थित होते.
वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासोबतच समाजात सामाजिक बांधिलकी आणि निसर्गप्रेमाची भावना रुजविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. भविष्यातही पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
Comments
Post a Comment