गणेशोत्सव डॉल्बीमुक्त व शांततेत साजरा करा; महाबळेश्वर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन
गणेशोत्सव डॉल्बीमुक्त व शांततेत साजरा करा; महाबळेश्वर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गणेश मंडळांना मार्गदर्शन; १०० ते १२५ पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती
महाबळेश्वर | प्रतिनिधी
आगामी गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता पार पडावा, यासाठी महाबळेश्वर पोलिसांकडून गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची व प्रतिष्ठित नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.४५ ते २.१० या वेळेत महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सह्याद्री रेस्ट हाऊस येथे ही बैठक पार पडली.
वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना विविध महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. गणेशोत्सव काळात शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवत नियमांचे पालन करून उत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले.
बैठकीदरम्यान आदर्श गणेशोत्सव मंडळासाठी असलेल्या नियमावलीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मंडळांनी उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही, याची दक्षता घ्यावी, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे सांगण्यात आले. गणेशोत्सव डॉल्बीमुक्त वातावरणात साजरा करण्याचेही आवाहन करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या काळात गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था, वीज सुरक्षेची काळजी, आरोग्यविषयक सुविधा तसेच सार्वजनिक ठिकाणी सुरक्षितता याबाबत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडूनही मार्गदर्शन करण्यात आले. विविध विभागांमध्ये समन्वय ठेवून उत्सव सुरळीत पार पाडण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
या बैठकीस महाबळेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आकाश पाटील, महाराष्ट्र विद्युत महामंडळाच्या उपकार्यकारी अभियंता भाग्यश्री डहाके, वैद्यकीय अधिकारी महाबळेश्वर तसेच महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक हर्षद अ. गालिंदे उपस्थित होते.
तसेच महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, प्रतिष्ठित नागरिक व पोलीस पाटील असे सुमारे १०० ते १२५ नागरिक व पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.
गणेशोत्सव हा सामाजिक ऐक्य, भक्ती आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव असून तो शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यासाठी गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी पोलिस प्रशासनाने केले. उत्सव काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि महाबळेश्वरची शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस व संबंधित प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
Comments
Post a Comment