रायखेडा शिवारात चारठाणा पोलिसांची मोठी कारवाई; गोवंशाची अवैध वाहतूक करणारा आयशर पकडला दहा पशुधनांची सुटका; जनावरे व वाहनासह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त
रायखेडा शिवारात चारठाणा पोलिसांची मोठी कारवाई; गोवंशाची अवैध वाहतूक करणारा आयशर पकडला
दहा पशुधनांची सुटका; जनावरे व वाहनासह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त
✍️उत्तम लोखंडे
परभणी/जिंतूर :
जालन्याहून वसमतकडे अवैधरीत्या गोवंशाची वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनावर चारठाणा पोलिसांनी पहाटेच्या सुमारास कारवाई केली. रायखेडा शिवारात संशयास्पदरीत्या आढळून आलेल्या आयशरची तपासणी केली असता त्यामध्ये कोंबून दहा पशुधनांची वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने वाहन ताब्यात घेत दहा जनावरांची सुटका केली. या कारवाईत जनावरे आणि आयशर असा एकूण सुमारे ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संभाजीनगर-नांदेड राज्य महामार्गावरील रायखेडा शिवारात शनिवार, २३ ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास चारठाणा पोलीस ठाण्याचे कर्मचारी उद्धव माने, खरात तसेच दोन होमगार्ड रात्रीची गस्त घालत होते. त्यावेळी जालन्याहून वसमतकडे जाणारा एमएच ०२ ईआर ६४०५ क्रमांकाचा आयशर संशयास्पद स्थितीत जाताना पोलिसांच्या निदर्शनास आला.
पोलिसांनी वाहन थांबवून त्याची तपासणी केली असता आयशरमध्ये दहा पशुधन अत्यंत दाटीवाटीने भरल्याचे आढळून आले. वाहनातील चालकासह अन्य दोन व्यक्तींकडे पोलिसांनी चौकशी केली. मात्र, त्यांच्या उत्तरांमध्ये विसंगती आढळून आल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्यानंतर पोलिसांनी आयशर ताब्यात घेत चारठाणा पोलीस ठाण्यात आणला.
कारवाईदरम्यान पोलिसांनी वाहनातील दहा पशुधनांची सुटका केली. जनावरांना पुढील सुरक्षिततेसाठी इटोली येथील गोशाळेत पाठविण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या पशुधनाची अंदाजे किंमत चार लाख रुपये, तर जुना वापरलेला आयशर वाहनाची अंदाजे किंमत चार लाख रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यामुळे या कारवाईत एकूण ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उद्धव माने यांच्या फिर्यादीवरून रमेश सुरेश गायकवाड (वय ३८, रा. गणेशपूर, ता. वसमत), आदेश गौतमराव मस्के (वय २४, रा. आंबेडकर नगर, वसमत) आणि साजिद वहाब शेख (रा. वसमत) या तिघांविरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमातील कलम ५(अ), ५(ब), ९, प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक अधिनियमातील कलम ११(१)(ड), मोटार वाहन कायद्यातील कलम १२५(इ) तसेच अन्य संबंधित कलमानुसार कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघ करीत आहेत. रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवैध पशुवाहतुकीचा प्रकार उघडकीस आल्याने पोलिसांच्या या कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment