कर्मवीरांच्या विचारांचा वारसा जपत समाजसेवेची वाटचाल; डॉ. अनिल पाटील यांना ‘कर्मवीर वारसा कृतज्ञता पुरस्कार’सोशल हँड्स फाउंडेशनचा रक्षाबंधनानिमित्त उपक्रम; शाहू बोर्डिंगला गॅस शेगडीची भेट, विद्यार्थ्यांना दैनंदिन उपयोगी साहित्याचे वाटप
कर्मवीरांच्या विचारांचा वारसा जपत समाजसेवेची वाटचाल; डॉ. अनिल पाटील यांना ‘कर्मवीर वारसा कृतज्ञता पुरस्कार’
सोशल हँड्स फाउंडेशनचा रक्षाबंधनानिमित्त उपक्रम; शाहू बोर्डिंगला गॅस शेगडीची भेट, विद्यार्थ्यांना दैनंदिन उपयोगी साहित्याचे वाटप
सातारा प्रतिनिधी:
रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून छत्रपती शाहू बोर्डिंग, धनिणीची बाग, सातारा येथे सोशल हँड्स फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे संघटक तथा माजी कार्याध्यक्ष डॉ. अनिल आप्पासाहेब पाटील यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘ऐतिहासिक कर्मवीर वारसा कृतज्ञता पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ तथा निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ, DRDO डॉ. अशोक नगरकर यांच्या हस्ते डॉ. अनिल पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. नगरकर यांनी भारताचे माजी राष्ट्रपती व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासोबत १२ वर्षांहून अधिक काळ काम केले असून, संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी
रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दुर्गम व ग्रामीण भागातील गोरगरीब, वंचित तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. अनिल पाटील यांनी केलेल्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, यासाठी रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), तंत्रज्ञानाधारित उपक्रम आणि कौशल्यविकास यावरही भर दिला जात असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगाशी जुळवून घेत ज्ञान, कौशल्य आणि संशोधनाची कास धरावी, असे आवाहनही त्यांनी केले.
कर्मवीरांच्या त्यागाचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर
पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. अनिल पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेमागील संघर्ष, कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई पाटील यांचा त्याग तसेच शाहू बोर्डिंगच्या ऐतिहासिक वाटचालीची माहिती दिली.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण व वंचित समाजातील मुलांना शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने शिक्षणाची चळवळ उभी केली. या कार्यात लक्ष्मीबाई पाटील यांनीही मोठा त्याग केला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी आपले दागिने गहाण ठेवून संस्थेच्या कार्याला हातभार लावला, अशी प्रेरणादायी माहिती डॉ. पाटील यांनी दिली.
१९२४ मध्ये स्थापन झालेले छत्रपती शाहू बोर्डिंग हे रयत शिक्षण संस्थेचे पहिले वसतिगृह असल्याचे त्यांनी सांगितले. या वास्तूमधून अनेक विद्यार्थी घडले असून, त्यांनी पुढे समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले. महात्मा गांधींसह अनेक मान्यवरांनी या ठिकाणी भेट दिल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याची महती सांगताना गांधीजींच्या विचारांचा संदर्भ देत, “जे आम्हाला साबरमतीमध्ये करता आले नाही, ते भाऊराव पाटलांनी शाहू बोर्डिंगमध्ये करून दाखवले,” या आशयातून कर्मवीरांच्या कार्याची उंची त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली.
‘विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रात यावे’ – डॉ. अशोक नगरकर
यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना संशोधन क्षेत्रात येण्याचे आवाहन केले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात केवळ नोकरीच्या मागे न लागता विद्यार्थ्यांनी संशोधन, नवकल्पना आणि पेटंट याकडेही गांभीर्याने पाहावे, असे त्यांनी सांगितले.
आपल्या मुलीचा उदाहरण देताना डॉ. नगरकर म्हणाले की, “माझी कन्या अंकिता नगरकर हिने दहावीत असतानाच एक पेटंट मिळवले असून, तिच्यावर एक पुस्तकही लिहिण्यात आले आहे.” विद्यार्थ्यांनी लहान वयापासूनच जिज्ञासा, प्रयोगशीलता आणि संशोधनाची वृत्ती जोपासावी, असा संदेश त्यांनी दिला.
आपल्या संशोधन कार्याविषयी माहिती देताना त्यांनी ४०० हून अधिक पेटंट्सचा अभ्यास केला असून, ३०० हून अधिक पेटंट्स रजिस्टर्ड केले असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात नवनिर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
माजी विद्यार्थ्यांकडून समाजसेवेचा वसा
छत्रपती शाहू बोर्डिंगमध्ये शिक्षण घेतलेल्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत सोशल हँड्स फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्याची वाटचाल सुरू ठेवली आहे. विविध वसतिगृहांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मदत करणे, त्यांच्या गरजा जाणून घेऊन आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबविणे, या माध्यमातून संस्थेचे कार्य सुरू आहे.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसोबत सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यंदा छत्रपती शाहू बोर्डिंगला सोशल हँड्स फाउंडेशनच्या वतीने गॅस शेगडी भेट देण्यात आली. तसेच मुला-मुलींना त्यांच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.
रक्षाबंधनाच्या सणाला सामाजिक बांधिलकीची जोड देत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये आपलेपणा, सहकार्य आणि समाजसेवेची भावना निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे डी. एन. मगदूम, साठे सर, डी. व्ही. भोसले सर, पी. डी. जाधव सर, छत्रपती शाहू बोर्डिंगचे केअरटेकर प्रशांत गुजरे सर, लक्ष्मीबाई पाटील हॉस्टेलच्या जगताप मॅडम, तसेच सोशल हँड्स फाउंडेशनचे सदस्य मदन दळे, सुदर्शन जाधव, बापू दिंडे, संतोष एकतपुरे आदी उपस्थित होते.
यावेळी आप्पा आवटे व विलास गवळी यांनी मनोगत व्यक्त केले. छत्रपती शाहू बोर्डिंगचे केअरटेकर प्रशांत गुजरे यांनी सूत्रसंचालन केले, तर राज्यकर अधिकारी अमोल गोरे, कोल्हापूर यांनी आभार प्रदर्शन केले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक विचारांचा वारसा पुढे नेत विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकीने कार्य करणाऱ्या सोशल हँड्स फाउंडेशनच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने शिक्षण, समाजसेवा, तंत्रज्ञान आणि संशोधनाचा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
Comments
Post a Comment