फलटणमध्ये गांजाविक्री करणाऱ्या दोघांना अटक; ५ किलो ७३० ग्रॅम गांजा जप्त
फलटणमध्ये गांजाविक्री करणाऱ्या दोघांना अटक; ५ किलो ७३० ग्रॅम गांजा जप्त
स्थानिक गुन्हे शाखा सातारा व भुईंज पोलिसांची संयुक्त कारवाई; आतापर्यंत तिघांना अटक, १ लाख २१ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त
भुईंज | प्रतिनिधी
अवैध अंमली पदार्थांची विक्री आणि साठवणुकीविरोधात सातारा पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली असून, भुईंज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गांजाविक्रीच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, सातारा आणि भुईंज पोलीस ठाण्याच्या पथकाने फलटण शहरातील सोमवार पेठ येथे संयुक्तपणे छापा टाकून ही कारवाई केली. या कारवाईत ३ किलो ९३० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत ८२ हजार ५३० रुपये आहे.
भुईंज पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. २८२/२०२६, अमली पदार्थ अधिनियमातील कलम ८(क), २०(ब) व इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान गांजाच्या अवैध विक्रीच्या साखळीचा शोध घेत पोलिसांनी पुढील कारवाई केली.
तपासादरम्यान परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूनम झगडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या मदतीने सोमवार पेठ, फलटण येथे छापा टाकला. या कारवाईत अमरदीप संजय गायकवाड (वय ३८) आणि संजय रायबा गायकवाड (वय ६०) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून ३ किलो ९३० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत ८२ हजार ५३० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंत एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तिन्ही आरोपींकडून एकूण ५ किलो ७३० ग्रॅम गांजा, ज्याची किंमत १ लाख २१ हजार ३३० रुपये, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे या कारवाईतून गांजाच्या अवैध विक्रीचे जाळे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूनम झगडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, तसेच सुरज शिंदे, पुजारी, अजित मोरे, मुलानी, लैलेश फडतरे, रोहित निकम, अरुण पाटील यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला.
भुईंज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी तोडरमल, वैभव टकले, सपोफौ. नितीन जाधव, गणेश घोटकर, पोलीस हवालदार सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते आणि आकाश कुंभार यांनीही या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई सुरूच
अवैध गांजा विक्री, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात भुईंज पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. तरुणांमध्ये अंमली पदार्थांचा वाढता वापर रोखण्यासाठी तसेच अशा पदार्थांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून, संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या उल्लेखनीय कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी कारवाईत सहभागी सर्व अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment