रक्षाबंधनाच्या निमित्ताने बंदी निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळावा; कौशल्यातून स्वावलंबनाचा संदेश
रक्षाबंधनाच्या निमित्ताने बंदी निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळावा; कौशल्यातून स्वावलंबनाचा संदेश
कारागृह हे केवळ शिक्षेचे ठिकाण नसून सुधारगृह आहे : डॉ. सुहास वारके
मुंबई : प्रतिनिधी
रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून बंदींच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या कौशल्याला बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि कारागृहातून मुक्त झाल्यानंतर त्यांना सन्मानाने व स्वावलंबी जीवन जगता यावे, या उद्देशाने बंदी निर्मित विविध वस्तूंच्या प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन कारागृह व सुधारसेवा महासंचालक डॉ. सुहास वारके यांच्या उपस्थितीत सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा पवार-साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. सुहास वारके यांनी कारागृह प्रशासनाच्या सुधारणा व पुनर्वसनाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. “कारागृह हे केवळ शिक्षेचे ठिकाण नसून ते सुधारगृह आहे. बंदींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना विविध कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.
कारागृह विभागाचे ‘सुधारणा व पुनर्वसन’ हे ब्रीद असून, कारागृहातील बंदी हा समाजाचाच एक घटक आहे. त्यांच्यातील सकारात्मक गुणांना आणि कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र कारागृह उद्योगांतर्गत विविध कौशल्याधारित प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणातून बंदींना विविध प्रकारच्या वस्तू तयार करण्याचे व्यावसायिक कौशल्य प्राप्त होत आहे.
या प्रदर्शनात बंदींनी कौशल्यातून तयार केलेल्या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये आकर्षक फर्निचर, देवघर, विविध शोभेच्या वस्तू, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, आकर्षक राख्या, कपडे, हस्तमाल, टॉवेल, बेडशीट, चादरी, बेकरी पदार्थ, बिस्कीट तसेच अन्य उपयोगी आणि कलात्मक वस्तूंचा समावेश आहे.
बंदींच्या हातातील कौशल्याला बाजारपेठ मिळाल्यास त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. कारागृहातून मुक्त झाल्यानंतर रोजगारासाठी इतरांवर अवलंबून न राहता स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची संधी त्यांना मिळते. त्यामुळे पुनर्वसनाची प्रक्रिया अधिक प्रभावी होऊन त्यांना समाजात सन्मानाने जीवन जगण्यास मदत होते, असे डॉ. वारके यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अभिनेत्री पूजा पवार-साळुंखे यांनी प्रदर्शनातील बंदींनी तयार केलेल्या वस्तूंचे कौतुक केले. कारागृह प्रशासन आणि बंदींच्या या सकारात्मक प्रयत्नांना समाजाने पाठबळ देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन बंदी निर्मित वस्तूंची खरेदी करावी आणि त्यांच्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेला हातभार लावावा, असे आवाहन पूजा पवार यांनी केले.
रक्षाबंधनासारख्या सणाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनामुळे बंदींच्या कलागुणांना व्यासपीठ मिळण्याबरोबरच समाज आणि कारागृहातील व्यक्तींमध्ये सकारात्मक संवाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. शिक्षा भोगतानाच कौशल्य आत्मसात करून भविष्यात समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने परतण्याची संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम ठरत आहे.
यावेळी माहेर महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा विद्या म्हात्रे यांच्यासह कारागृह प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment