मोटार-सोलार पंप चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; पाच गुन्ह्यांची उकल
मोटार-सोलार पंप चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; पाच गुन्ह्यांची उकल
✍️उत्तम लोखंडे
परभणी/सेलू प्रतिनिधी :
परभणी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मोटार व सोलार पंप तसेच इतर साहित्य चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या चोरीच्या घटनांचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितांना ताब्यात घेत महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल पाच चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली असून, आरोपींकडून रोख रक्कम, चोरीचे साहित्य आणि चोरीसाठी वापरण्यात आलेला ऑटो असा एकूण २ लाख ३६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक परभणी शहर परिसरात गस्तीवर असताना पेडगाव फाटा येथे आले. त्यावेळी एका इसमाकडून ऑटोमधून चोरीचे साहित्य वाहतूक करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित इसमाला ताब्यात घेऊन त्याच्या ऑटोची झडती घेतली.
झडतीदरम्यान ऑटोमध्ये बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेली तार आढळून आली. पोलिसांनी संबंधिताची कसून चौकशी केली असता त्याने आपले नाव ज्ञानेश्वर हरिभाऊ चव्हाण, रा. नेहरानगर, पाथरी रोड, परभणी असे सांगितले. पुढील चौकशीत त्याने परभणी ग्रामीण व शहर परिसरात सविता किशोर ढेंबरे आणि परवीन रफिक शेख या दोन महिलांच्या मदतीने चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पुढील तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपींकडून तसेच त्यांच्या माध्यमातून रोख ८५ हजार रुपये, चोरीची तार आणि एक ऑटो असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपी सौरभ ज्ञानेश्वर चव्हाण याच्याकडूनही रक्कम मित्रामार्फत पोलिसांकडे हजर करून घेण्यात आली असून ती जप्त करण्यात आली आहे.
पाच गुन्ह्यांची उकल
आरोपींची अधिक चौकशी केली असता त्यांनी परभणी ग्रामीण पोलीस ठाणे आणि बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटना केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या तपासामुळे मोटार व सोलार पंप चोरीसह संबंधित चोरीच्या एकूण पाच गुन्ह्यांचा छडा लागला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यास मदत होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, आरोपींकडून आणखी काही चोरीच्या घटनांची माहिती समोर येते का, याबाबत तपास यंत्रणा चौकशी करत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायभाय, पोलीस उपनिरीक्षक गणेश संवडकर, मधुकर चट्टे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, पोलीस हवालदार रवि जाधव, दीपक मुदीराज, केशव लटपटे, नेताजी गिते, लक्ष्मण कांगणे, जयश्री आव्हाड, अनिता राठोड, महारुद्र सपकाळ, शरद सावंत आणि नामदेव धोत्रे यांच्या पथकाने केली.
Comments
Post a Comment