शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमुक्ती योजनेचा दुसरा हप्ता जारी६ लाख ३६ हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ५,०८६ कोटींचा कर्जमुक्तीचा लाभ; आतापर्यंत १२.५८ लाख शेतकऱ्यांना १०,११५ कोटींचा लाभ


शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमुक्ती योजनेचा दुसरा हप्ता जारी

६ लाख ३६ हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ५,०८६ कोटींचा कर्जमुक्तीचा लाभ; आतापर्यंत १२.५८ लाख शेतकऱ्यांना १०,११५ कोटींचा लाभ

मुंबई प्रतिनिधी :

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील लाभ वितरणाला सुरुवात झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ६ लाख ३६ हजार ३६ पात्र शेतकऱ्यांना तब्बल ५ हजार ८६ कोटी रुपयांचा कर्जमुक्तीचा लाभ थेट ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आला. त्यामुळे कर्जबाजारीपणाच्या संकटात असलेल्या हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील लाभाचे ऑनलाइन वितरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्रिमंडळातील सदस्य तसेच मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी आणि सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आतापर्यंत १२.५८ लाख शेतकऱ्यांना लाभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीत आतापर्यंत १२ लाख ५८ हजार २४३ शेतकऱ्यांना एकूण १० हजार ११५ कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे.

पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया अद्याप सुरू असून, लाभार्थींची संख्या सातत्याने अद्ययावत होत आहे. आतापर्यंत १३ लाख ७० हजार कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर विभाग आघाडीवर

दुसऱ्या टप्प्यात विभागनिहाय कर्जमुक्तीचा लाभ पुढीलप्रमाणे देण्यात आला आहे—

अमरावती विभाग – १ लाख ४५ हजार ८०८ शेतकरी; १ हजार २०८ कोटी रुपये.

नाशिक विभाग – ८४ हजार ८१३ शेतकरी; ७५६ कोटी रुपये.

छत्रपती संभाजीनगर विभाग – ३ लाख २ हजार २७३ शेतकरी; २ हजार २८४ कोटी रुपये.

पुणे विभाग – ४९ हजार २२४ शेतकरी; ४१७ कोटी रुपये.

नागपूर विभाग – ४४ हजार ८६४ शेतकरी; ३६६ कोटी रुपये.

कोकण विभाग – ९ हजार ५४ शेतकरी; ५४ कोटी रुपये.

यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येच्या आणि वितरित करण्यात आलेल्या निधीच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर विभागाचा वाटा सर्वाधिक आहे.

पारदर्शक पद्धतीने अंमलबजावणी

शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देताना संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पात्रता निश्चिती, आधार प्रमाणीकरण आणि लाभ वितरणाची प्रक्रिया संगणकीकृत पद्धतीने करण्यात येत असून, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नियंत्रणाखाली या प्रक्रियेचे व्यवस्थापन केले जात आहे.

कर्जमुक्तीच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी थेट ऑनलाइन पद्धतीने वितरित झाल्याने पात्र शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून, शेतीच्या पुढील हंगामासाठी आवश्यक भांडवल उभारण्यासही मदत होण्याची अपेक्षा आहे. लाभ वितरणाची प्रक्रिया पुढेही सुरू राहणार असल्याने आणखी पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl